भारताची नेमबाज राही सरनोबतने बंदुकीमध्ये झालेल्या बिघाडानंतरही मंगळवारी प्रेसिडेंट्स चषक नेमबाजी स्पर्धेमधील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले.

राहीने अंतिम फेरीत ३१ गुण मिळवले. परंतु बंदुकीमधील बिघाडामुळे अखेरच्या दोन मालिकांमधील काही महत्त्वाचे नेम चुकले. ही समस्या येण्याआधी राहीने उत्तम कामगिरी करीत सलग तीन वेळा लक्ष्यभेद केला.  जर्मनीच्या व्हेनेकॅम्पने ३३ गुणांसह सुवर्ण, तर मॅथिल्डे लॅमोलेने २७ गुणांसह कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरी गाठणारी भारताची अन्य स्पर्धक मनू भाकरला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

मनूला मिश्र गटात सुवर्ण

मनूने टर्कीच्या ओझगूर वर्लिकच्या साथीने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र गटात सुवर्णपदकाची नोंद केली. मनू-ओझगूर जोडीने शियाओ (चीन) आणि पीटर ओलीस्क (ईस्पोनिया) जोडीचा ९-७ असा पराभव केला.