मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया ५ आणि ६ ऑगस्टला मुंबईत पार पडणार आहे, अशी माहिती संयोजक मशाल स्पोर्ट्सने शुक्रवारी दिली आहे. यंदाच्या लिलावात ५००हून अधिक खेळाडूंचा सहभाग असेल. देशातील, परदेशातील आणि नव्या युवा खेळाडूंना (एनवायपी) लिलाव प्रक्रियेसाठी अ, ब, क आणि ड अशा चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. या गटांमध्येही अष्टपैलू, चढाईपटू आणि पकडपटू असे उपविभाग आहेत.

आठव्या हंगामातील विशेष श्रेणीतील कमाल सहा खेळाडूंना आणि नव्या युवा खेळाडूंमधील चार खेळाडूंना लीगच्या धोरणानुसार प्रत्येक संघाला कायम राखता येऊ शकते, असे प्रो कबड्डी लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.

  •   अ गटासाठी ३० लाख रुपये, ब गटासाठी २० लाख रुपये, क गटासाठी १० लाख रुपये आणि ड गटासाठी सहा लाख रुपये आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे.
  •   प्रत्येक संघाला खेळाडूंच्या खरेदीसाठी ४ कोटी, ४० लाख रुपये रक्कम खर्च करण्याची मर्यादा असेल.
  • बंगळूरु येथे झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन्ही संघांमधील २४ खेळाडूंना लिलावात थेट स्थान देण्यात आले आहे.