आपल्या घरच्या मैदानावर खेळताना दुबळ्या तामिळ थलायवाज संघावर सुरजित सिंहच्या बंगाल वॉरियर्स संघाने मात केली आहे. २९-२५ अशा फरकाने सामना जिंकत बंगालने घरच्या मैदानावर आपला चांगला फॉर्म कायम ठेवला आहे. तामिळ थलायवाज संघ हा गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यात बंगालच्या संघाला कितपत प्रतिकार होईल ही शंकाच होती. मात्र अखेरच्या सत्रात तामिळने बंगालला चांगली टक्कर देत आपल्या पराभवाचं अंतर कमी करत सामन्यातून १ गुणाची कमाई केली.

चढाई आणि बचावपटूंच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर बंगाल वॉरियर्सला आजचा सामना जिंकण शक्य झालं. बंगालकडून मणिंदर सिंह सर्वाधिक ६ गुणांची कमाई केली. त्याला जँग कून लीने ४, विनोद कुमारने ३ तर बदली खेळाडू भुपिंदर सिंहने २ गुण मिळवत चांगली साथ दिली. तामिळ थलायवाजच्या संघाकडून फारशी टक्कर मिळत नसल्याचं पाहून बंगालच्या सर्व खेळाडूंनी आज आपल्या डावपेचांचा सराव करुन घेतला.

चढाईपटूंप्रमाणे बंगालच्या बचावफळीनेही या सामन्यात चांगली कामगिरी बजावली. सुरजित सिंह, रण सिंह आणि शशांक वानखेडे यांनी तामिळ थलायवाजच्या चढाईपटूंना सामन्यात परतण्याची साधी संधीही दिली नाही. त्यामुळे एकंदरीत संपूर्ण सामन्यात बंगाल वॉरियर्सचा बोलबाला दिसून आला. काही मोजक्या नावाजलेल्या खेळाडूंच्या जोरावर मैदानात उतरलेल्या तामिळ थलायवाजने या सामन्यातही निराशाजनक कामगिरी केली. कर्णधार अजय ठाकूरसह एकाही खेळाडूला सामन्यात आपल्या कामगिरीत सातत्य दाखवता आलेलं नाही.

अखेरच्या क्षणांमध्ये तामिळ थलायवाजने बंगालच्या संघाला थोडीशी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत वेळ हातातून निघून गेली होती. त्यामुळे तामिळ थलायवाज संघाचं या स्पर्धेतलं आव्हान आता जवळपास संपल्यात जमा आहे.