प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात आपला तिसरा विजय संपादीत करत तामिळ थलायवाजने आज आणखी एका बलवान संघाला पराभवाचा धक्का दिला. पिछाडी भरुन काढत बलाढ्य बंगाल वॉरियर्सवर ३३-३२ अशा एका गुणाच्या फरकाने मात करत तामिळ थलायवाजने सामन्यावर आपलं नाव कोरलं.

सुरुवातीपासून या सामन्यात बंगाल वॉरियर्सने आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. चढाई आणि बचाव अशा दोन्ही विभागात अष्टपैलू खेळ करत बंगालने तामिळ थलायवाजला सामन्यात पुढे जाण्याची संधी दिली नाही. बंगाल आणि तामिळ थलायवाज यांच्या गुणात केवळ १ ते २ गुणांचा फरक होता, मात्र हा फरक राखून ठेवण्यात बंगाल यशस्वी झाला होता. मात्र अखेरच्या क्षणी झालेल्या हाराकिरीचा फायदा उचलत तामिळ थलायवाजने बंगाल वॉरियर्सला पराभवाचा धक्का दिला.

बंगालकडून आजच्या सामन्यात मणिंदर सिंहने चढाईत १३ गुणांची कमाई केली. त्याला दिपक नरवाल आणि जँग कूम लीने प्रत्येकी ४-४ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. तामिळ थलायवाजच्या दुबळ्या बचावाचा फायदा उचलत तिन्ही चढाईपटूंनी आपल्या संघासाठी गुण मिळवले. कर्णधार सुरजित सिंहने बचावात सर्वाधीक ५ गुणांची कमाई करत आपली कामगिरी चोख बजावली. त्याला रणसिंहने २ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये दबावाखाली येऊन बंगालच्या बचावफळीने केलेल्या चुका त्यांना सामन्यात चांगल्याच महागात पडल्या.

तामिळ थलायवाजने आजच्या सामन्यात केलेला खेळ हा खरच कौतुकास्पद होता. पहिल्या सत्रातली पिछाडी भरुन काढत दुसऱ्या सत्रात तामिळने दोन्ही संघांमधल्या गुणाचं अंतर कमी केलं. शेवटच्या सेकंदरापर्यंत गुण मिळवत रहायचं उद्दीष्ट ठेवल्याने तामिळला या सामन्यात विजय मिळवणं शक्य झालं. तामिळ थलायवाजकडून कर्णधार अजय ठाकूरने ८ गुणांची कमाई केली. अजयला चढाईपेक्षा बचावफळीतल्या खेळाडूंनी आज चांगली साथ दिली. सी. अरुणने दुसऱ्या सत्रात बंगालच्या चढाईपटूंवर अंकुश लावत सामन्यात ८ गुणांची कमाई केली. त्याला संकेत चव्हाणने २ तर अमित हुडाने १ गुणाची कमाई करत चांगली साथ दिली. या विजयामुळे तामिळ थलायवाजच्या गुणतालिकेतील स्थानावर कोणताही परिणाम होणार नसला तरीही या विजयामुळे त्यांच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होणार आहे.