बंगळुरु बुल्सच्या कमकूवत बचावफळीचा फायदा घेत पुणेरी पलटण संघाने प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात गतविजेत्या बंगळुरु बुल्सचा पराभवाचा धक्का दिला आहे. ३१-२३ च्या फरकाने सामन्यात बाजी मारत पुणेरी पलटण संघाने स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.

पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळ केला. मनजीत आणि शहाजी जाधव या तरुण खेळाडूंनी चढाईमध्ये १२ गुण कमावले. बंगळुरु बुल्सच्या बचावफळीला खिंडार पाडण्याचं महत्वाचं काम पुण्याच्या चढाईपटूंनी केलं. बदली खेळाडू अमित कुमारनेही चढाईत ५ गुण मिळवत आपल्या सहकाऱ्यांना चांगली साथ दिली. पुण्याकडून कर्णधार सुरजित सिंहने बचावफळीत ६ गुणांची खेळी केली.

अवश्य वाचा – BARC Ratings : भारत-विंडीज मालिकेची प्रेक्षकसंख्या घटली, प्रो-कबड्डीची मुसंडी

बंगळुरु बुल्सच्या बचावफळीने आजच्या सामन्यात निराशा केली. रोहित कुमार आणि पवन शेरावत यांनी चढाईमध्ये पुण्याला झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र अमित शेरॉनचा अपवाद वगळता एकही बचावपटू पुण्याच्या चढाईपटूंवर अंकुश ठेवू शकला नाही. या विजयानंतर बंगळुरु बुल्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.