इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनचे मनोगत

न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीतील पराभवामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले याचे दु:ख असले, तरी सामन्यात केलेल्या झुंजार कामगिरीचा अभिमान असल्याचे मनोगत इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने व्यक्त केले.

२०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ‘सुपर ओव्हर’मध्ये अधिक सीमापार (चौकार-षटकारांच्या) फटक्यांच्या जोरावर न्यूझीलंडवर सरशी साधली होती. मात्र, या पराभवाची परतफेड करताना न्यूझीलंडने बुधवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाच गडी राखून विजय मिळवत इंग्लंडला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. हा पराभव स्वीकारणे मॉर्गनला अवघड गेले. ‘‘आम्हाला खूप दु:ख झाले आहे. अटीतटीच्या सामन्यातील पराभव स्वीकारणे नेहमीच अवघड असते. मात्र, आमच्या फलंदाजांनी प्रतिकूल खेळपट्टीवर जिद्दीने खेळ केला आणि चांगली धावसंख्या उभारली,’’ असे मॉर्गन म्हणाला.

‘‘आमच्या संघाने केलेल्या झुंजार कामगिरीचा मला अभिमान आहे. तुम्ही चांगला खेळ केलात तरी विजय प्राप्त करणारच याची खात्री नसते,’’ असेही मॉर्गनने नमूद केले.

नीशामची खेळी निर्णायक -विल्यम्सन

जिमी नीशामने (११ चेंडूंत २७) पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी केल्यामुळे सामना आमच्या बाजूने फिरला. त्याची खेळी निर्णायक ठरली, असे इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन म्हणाला. तसेच त्याने नाबाद ७२ धावांची खेळी करणाऱ्या सलामीवीर डॅरेल

मिचेलचे कौतुक केले. ‘‘मिचेलने उत्कृष्ट फलंदाजी करताना अविस्मरणीय खेळी केली. आघाडीच्या फळीतील फलंदाजांकडून हे फारसे पाहायला मिळत नाही,’’ असे विल्यम्सनने म्हटले.