पाकिस्तान सुपर लीग टी-२० मालिकेदरम्यान एका सामन्यात आपल्याच संघातील खेळाडूशी क्षेत्ररक्षण करताना धडक होऊन जखमी झालेल्या फाफ ड्यूप्लेसिसने रविवारी आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली. आपल्याला आता बरं वाटत असून रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला आल्याचं ड्यूप्लेसिसने सांगितलं आहे. पेशावर झल्मीविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना क्वेट्टा ग्लॅडिएटर्सच्या ड्यूप्लेसिसची मोहम्मद हसनैनशी अनवधानाने धडक बसली. या घटनेनंतर ड्यूप्लेसिस मैदानावर कोसळला आणि काही मिनिटे तसाच पडून होता. शनिवारच्या सामन्यामध्ये हा प्रकार घडल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर डय़ूप्लेसिस डगआऊटकडे परतला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेशावरच्या डावाच्या १९व्या षटकात सीमारेषेपाशी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात ड्यूप्लेसिसचे डोके हसनैनच्या गुडघ्यावर आदळले. ड्यूप्लेसिसच्या उजव्या कानाखाली मानेवरील भागामध्ये सूज आल्याचं तो डगआऊटकडे परतताना दिसत होते. तो चालतच डगआऊटकडे परत गेला. “सर्वांनी सहकार्य करण्यासंदर्भातील मेसेज पाठवून विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद. मी हॉटेलमध्ये परतलो असून माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. या धडकेमुळे काही प्रमाणात माझ्या स्मृतीवर परिणाम (मेमरी लॉस) झालाय. मात्र माझी प्रकृती उत्तम आहे. मी लवकरच मैदानात परतेल अशी आशा आहे. खूप सारं प्रेम,” असं ड्यूप्लेसिसने ट्विट केलं आहे.

ड्यूप्लेसिसच्या जागी क्वेट्टा ग्लॅडिएटर्सकडून साइम आयुबला संधी देण्यात आलीय. क्वेट्टा ग्लॅडिएटर्सच्या संघ सहकाऱ्यांमध्ये घडलेली ही धडकेची दुसरी घटना आहे. “या घटनेने मी पुरती हादरली आहे. फाफची रुग्णालयात नेऊन तपासणी करण्याची आवश्यकता आहे?’’ असे ड्यूप्लेसिसची पत्नी इमारीने इन्स्टाग्रामवर म्हटलं होतं.

ज्या क्वेट्टा ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झल्मी सामन्यात ड्यूप्लेसिस जखमी झाला तो त्याचा पीएसएलमधील दुसऱ्या सामना होता. त्याने इस्लामाबाद युनायटेडविरुद्धच्या सामन्यात पाच धावा केल्या होत्या. या सामन्यात ग्लॅडिएटर्सच्या संघावर इस्लामाबादच्या संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता. पीएसएलचे सामने पुन्हा सुरु होण्याआधी ड्यूप्लेसिस इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२१ मध्ये खेळत होता. त्याने या मालिकेमध्ये सात सामन्यात ३२० धावा केल्या. यामध्ये त्याने सलग चार सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली होती. चेन्नई सुपर किंग्सच्या यंदाच्या सिझनमधील कामगिरीत ड्यूप्लेसिसचा मोठा वाटा आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आलीय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psl faf du plessis recovering with some memory loss after suffering concussion scsg
First published on: 14-06-2021 at 08:09 IST