भारताची युवा खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा या जोडीला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यामुळे आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत शनिवारी कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले.
१८ वर्षीय सिंधूने एक तास १८ मिनिटे चाललेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत दोन वेळा ऑल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या शिझियान वँगला कडवी लढत दिली. अखेर सिंधूला २१-१५, २०-२२, १२-२१ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. महिला दुहेरीत ज्वाला-अश्विनी जोडीचे आव्हान लुओ यू आणि लुओ यिंग या चीनच्या जोडीने १२-२१, ७-२१ असे सहज संपुष्टात आणले.
सिंधूने याआधी तिनदा शिझियानला हरवले होते. मात्र शिझियानने यावेळी कोणतीही चूक न करता मागील पराभवांचा वचपा काढला. हैदराबादच्या सिंधूने पहिल्या गेममध्ये सुरेख खेळ करत शिझियानला डोके वर काढण्याची संधी दिली नव्हती. आक्रमक खेळ करत तिने पहिला गेम जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये सिंधूचे फटके परतवून लावत, वेळेला खेळाची गती कमी करत शिझियानने सुरेख पुनरागमन केले. २०-१८ अशा स्थितीत असताना आपल्याच सव्‍‌र्हिसवर सिंधूला दोन गुण गमवावे लागले. त्यामुळे शिझियानने दुसरा गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये सिंधूला अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नाही. कामगिरीत सातत्य नसणे आणि सुमार फटके लगावल्यामुळे ज्वाला-अश्विनी जोडीला पराभवाचे तोंड पाहावे लागले.