R Praggnanandhaa Beats Magnus Carlsen: भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने लास व्हेगासमध्ये पार पडलेल्या फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेत दमदार कामगिरी केली. या स्पर्धेतील चौथ्या फेरीतील सामन्यात त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनचा दारूण पराभव केला. हा सामना १९ वर्षीय आर प्रज्ञानंदने अवघ्या ३९ चालीत संपवला. यासह मॅग्नस कार्लसनचा हा मोठ्या स्तरावर युवा भारतीय खेळाडूंविरूद्ध खेळताना दुसरा मोठा पराभव ठरला आहे. याआधी डी गुकेशनेही त्याला बाद करत जेतेपदाचा मान पटकावला होता.

पांढऱ्या सोंगट्यांसह खेळणाऱ्या आर प्रज्ञानंदने दमदार सुरूवात केली. संपूर्ण सामन्यादरम्यान त्याने नियंत्रणात राहून खेळ केला. या सामन्यात मॅग्नस कार्लसनची अचूकता ८४.९% तर आर प्रज्ञानंदची अचूकता ही ९३.९% इतकी होती. १० मिनिटे आणि १० सेंकद सुरू राहिलेल्या या सामन्यात आर प्रज्ञानंद आघाडीवर होता. ५ वेळचा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या मॅग्नस कार्लसनला हरवणं हे आर प्रज्ञानंदसाठी अतिशय खास आहे. कारण आता आर प्रज्ञानंदने बुद्धिबळातील तिन्ही प्रारूपात मॅग्नस कार्लसनला पराभूत केलं आहे. आर प्रज्ञानंदने क्लासिकल, रॅपिड आणि ब्लित्ज या तिन्ही प्रारूपात मॅग्नस कार्लसनविरूद्ध विजयाची नोंद केली आहे. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय असल्याचं म्हटलं जात आहे.

मॅग्नस कार्लसनला पराभूत केल्यानंतर आर प्रज्ञानंद म्हणाला, “मला सध्या क्लासिकल पेक्षा फ्रीस्टाइल बुद्धिबळ खेळायला जास्त आवडतं.” आर प्रज्ञानंदने या स्पर्धेतील पहिल्या फेरीत अब्दुसत्तोरोवविरूद्ध काळ्या सोंगट्यांसह खेळताना सामना बरोबरीत समाप्त केला. त्यानंतर त्याने असोबायेवर विजयाची नोंद केली.स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत काळ्या सोंगट्यांसह खेळताना त्याने केमरला पराभूत करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. आता चौथ्या फेरीत कार्लसनला पराभूत करत त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यासह कार्लसनचा या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर प्रज्ञानंदआधी डी गुकेशने देखील मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता. कार्लसनने गुकेशला कमकुवत खेळांडूपैकी एक असल्याचं म्हटलं होतं. याचं उत्तर त्याने आपल्या कामगिरीने दिलं होतं. क्रोएशियामध्ये झालेल्या सामन्यात त्याने मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवला होता. खेळावर नियंत्रण आणि अचूक प्लॅनिंगसह हा सामना गुकेशने ४९ चालींमध्ये आपल्या नावावर केला होता.