पुरुषांत अल्कराझ, रुबलेव्ह, तर महिलांमध्ये पेगुला, क्विटोव्हाचाही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

न्यूयॉर्क : नोव्हाक जोकोव्हिचच्या अनुपस्थितीत जेतेपदाचा प्रबळ असलेला दुसरा मानांकित स्पेनचा राफेल नदाल आणि अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑनटेकने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराझ व आंद्रे रुबलेव्ह यांनी, तर महिला एकेरीत जेसिका पेगुला व पेट्रा क्विटोव्हा यांनीही विजय नोंदवले.

विक्रमी २२ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने तिसऱ्या फेरीत फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केवर  ६-०, ६-०, ७-५ अशी मात केली. या सामन्याचे पहिले दोन सेट नदालने सहज जिंकत आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये गॅस्केने नदालसमोर आव्हान उपस्थित केले, पण नदालने खेळ उंचावत सामना जिंकला. नदालचा पुढच्या फेरीत अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोएशी सामना होणार आहे.

नवव्या मानांकित रुबलेव्हने कॅनडाच्या १९व्या मानांकित डेनिस शापोव्हालोव्हचा पाच सेट रंगलेल्या लढतीत ६-४, २-६, ६-७ (३-७), ६-४, ७-६ (१०-७) असा पराभव केला. चौथ्या फेरीत त्याचा सातव्या मानांकित ब्रिटनच्या कॅमेरून नॉरीशी सामना होणार आहे. स्पेनच्या तिसऱ्या मानांकित अल्कराझने अमेरिकेच्या जेन्सन ब्रूक्सबायला ६-३, ६-३, ६-३ असे नमवले.

महिला एकेरीत श्वीऑनटेकने आपली विजयी लय कायम ठेवत अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसला ६-३, ६-४ असे पराभूत करत चौथ्या फेरीत धडक मारली. अन्य सामन्यात, आठव्या मानांकित अमेरिकेच्या पेगुलाने पात्रता फेरीमधून आगेकूच केलेल्या चीनच्या युआन युइचा ६-२, ६-७ (६-८), ६-० असा पराभव केला. पहिल्या सेट पेगुलाने सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये युआनने पुनरागमन करत सामना बरोबरीत आणला. निर्णायक सेटमध्ये पेगुलाने प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीच संधी न देता विजय साकारला. क्विटोव्हाने चुरशीच्या लढतीत गार्बिन मुगुरुझाचा ५-७, ६-३, ७-६ (१२-१०) असा पराभव केला.

सेरेना समालोचकाच्या भूमिकेत?

२३ ग्रँडस्लॅम विजेती महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सचे अमेरिकन स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. हा तिच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना होता. मात्र खेळण्यातून निवृत्त होणार असले, तरी आपल्याला खेळाशी नाते कायम ठेवायचे असल्याचे सेरेनाने नमूद केले. ‘‘माझ्या आयुष्यात टेनिसला महत्त्वाचे स्थान आहे. टेनिसपासून दूर राहण्याचा मी विचारही करू शकत नाही,’’ असे सेरेना म्हणाली होती. त्यामुळे आगामी काळात ती समालोचकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतील आघाडीची क्रीडा वाहिनी ‘ईएसपीएन’ तिला करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहे.