नदालकडून डेल पोत्रोच्या वाटचालीपुढे पूर्णविराम; पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी रविवारी अँडरसनशी गाठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

रॉजर फेडररसारख्या दिग्गज टेनिसपटूला हरवून सर्वाचे लक्ष वेधणाऱ्या ज्युआन मार्टिन डेल पोत्रोच्या वाटचालीपुढे स्पेनच्या राफेल नदालने पूर्णविराम दिला. आता नदाल तिसऱ्या अमेरिकन खुल्या विजेतेपदापासून एका विजयाच्या अंतरावर आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असलेल्या नदालसमोर रविवारी क्रमवारीत ३२व्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनचे आव्हान असणार आहे. त्यामुळे कारकीर्दीतील सोळावे ग्रँडस्लॅम विजेतेपद नदालसाठी मोक्याचे ठरणार आहे.

३१ वर्षीय नदालने उपांत्य लढतीत डेल पोत्रोचा ४-६, ६-०, ६-३, ६-२ अशा फरकाने पराभव केला. आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर २०१० आणि २०१३मध्ये विजेतेपदावर मोहोर उमटवणारा नदाल कारकीर्दीतील २३व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. दहाव्यांदा जेतेपद पटकावून फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेवरील आपली मक्तेदारी यंदा सिद्ध करणारा नदाल चालू वर्षांत तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पध्रेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाकडे कूच करणाऱ्या अँडरसनने स्पेनच्या १२व्या मानांकित पाबलो कॅरेनो बुस्टाचा ४-६, ७-५, ६-३, ६-४ असा पराभव केला. तब्बल ५२ वर्षांनंतर अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेची अंतिम फेरी गाठणारा अँडरसन हा पहिला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला आहे.

२००९मध्ये अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱ्या डेल पोत्रोने उपांत्यपूर्व फेरीत चार सेटमध्ये फेडररला हरवले होते. त्यामुळेच डेल पोत्रो आणि नदाल यांच्यातील लढत ही मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी ठरली.

ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेच्या उपविजेतेपदानिशी नदालने यंदाच्या हंगामाला दमदार प्रारंभ केला. यंदाचे वर्ष भावनिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे, असे नमूद करणारा नदाल उपांत्य लढतीविषयी म्हणाला, ‘‘डेल पोत्रोने या लढतीसाठी विशिष्ट अभ्यास केल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी पहिल्या सेटनंतर रणनीतीमध्ये बदल केला आणि तो यशस्वी ठरला.’’

नदालने अँडरसनविरुद्ध आतापर्यंत झालेल्या चारही लढती जिंकल्या आहेत. परंतु तरीही अँडरसनला कमी लेखणार नाही, असे नदालने सांगितले. तो म्हणाला, ‘‘अँडरसन हा अत्यंत धोकादायक खेळाडू आहे. दिमाखदार सव्‍‌र्हिस आणि हार्ड कोर्टवर खेळण्यात तो माहीर आहे. वयाच्या बाराव्या वर्षीपासून मी त्याला ओळखतो. आयुष्यातील अनेक दुखापतींवर मात करून केलेल्या पुनरागमनामुळे अँडरसन हा उदयोन्मुख खेळाडूंसाठी एक आदर्श ठरू शकतो.’’

३१ वर्षीय अ‍ॅडरसनला १९८१नंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला ग्रँडस्लॅम विजेता होण्याची संधी चालून आली आहे. त्यावेळी जोहान क्रिकने ऑस्ट्रेलियन जेतेपदाला गवसणी घातली होती. त्याआधी १९६५मध्ये क्लिफ ड्रायसडेलने अमेरिकन खुल्या स्पध्रेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र मॅन्युएल सांतानाकडून पराभव पत्करल्यामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

पुरुष दुहेरीत रॉजर-तेकाऊ विजेते

डच खेळाडू जीन ज्युलियन रॉजर व रुमानियाचा खेळाडू होरिया तेकाऊ यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत अजिंक्यपद पटकावले. त्यांनी ११व्या मानांकित फेलिसिओ लोपेझ व मार्क लोपेझ यांच्यावर ६-४, ६-३ अशी मात केली व या स्पध्रेच्या विजेतेपदावर प्रथमच मोहोर उमटवली. त्यांचे हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी २०१५मध्ये विम्बल्डन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते. रॉजरने स्वातंत्र्यदेवतेचे चित्र असलेली जर्सी परिधान केली होती. या चित्रामुळेच मला अव्वल कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले, असे अंतिम सामना जिंकल्यानंतर रॉजरने सांगितले.

मिर्झा-पेंगचे आव्हान संपुष्टात

चौथ्या मानांकित सानिया मिर्झा (भारत) आणि शुय पेंग (चीन) जोडीचे अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेतील महिला दुहेरीमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मार्टिना हिंगीस (स्वित्र्झलड) आणि यंग-यान चॅन (चायनीज तैपेई) जोडीने ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये मिर्झा-पेंग जोडीला नामोहरम केले.

हिंगीस-मरेला मिश्र दुहेरीचे जेतेपद

स्वित्र्झलडच्या मार्टिना हिंगीसने इंग्लंडच्या जॅमी मरेच्या साथीने अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेच्या मिश्र दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. हिंगीस-मरे जोडीने अंतिम फेरीत चॅन हाओ चिंग (चायनीज तैपेई) आणि मायकेल व्हिनस (न्यूझीलंड) जोडीचा ६-१, ४-६, १०-८ अशा फरकाने पराभव केला. हिंगीसचे हे एकंदर २३वे आणि मिश्र दुहेरीतील सातवे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. हिंगीस रविवारी चॅनचया बहिणीसोबत महिला दुहेरीचा अंतिम सामना खेळणार आहे. अँडी मरेचा भाऊ जॅमीचे हे चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले.

गेल्या काही वर्षांत दुखापतींचे आव्हान पेलल्यानंतर यंदाचा हंगाम माझ्यासाठी सुखद ठरला. मी पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचलो आहे आणि आणखी एक जेतेपद जिंकण्याची मिळालेली ही संधी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.  -राफेल नदाल

उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्यानंतर संधी गमावल्यामुळे स्वत:वरच राग व्यक्त करण्याशिवाय पर्याय नाही. परंतु कदाचित उद्या शांतपणे मी ही स्पर्धा माझ्यासाठी किती महत्त्वाची होती, याचा विचार करीन. -ज्युआन मार्टिन डेल पोत्रो 

ज्यासाठी मेहनत केली जाते, त्या यशाच्या उंबरठय़ापाशी मी आलो आहे. टेनिस क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पध्रेच्या अंतिम फेरीचे दडपण माझ्यावर आहे. – केव्हिन अँडरसन

पुरुष एकेरी अंतिम सामना : राफेल नदाल वि. केव्हिन अँडरसन

सामन्याची वेळ : रविवारी मध्यरात्री  १.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि २

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal crushes juan martin del potro to reach us open final
First published on: 10-09-2017 at 01:29 IST