रणजी करंडक स्पर्धेची दुसरी फेरी सोमवारपासून सुरु झाली. या फेरीत पहिला सामना दिल्ली आणि हिमाचल प्रदेश यांच्यात सुरु आहे. सामन्यात दिल्लीचा नवोदित कर्णधार नितीश राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण करणारा हितेन दलाल आणि अनुभवी गौतम गंभीर दोघे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पण थोड्याच वेळात गंभीरला बाद देण्याच्या निर्णयावरून तो पंचांवर प्रचंड भडकल्याची घटना घडली.

सामन्याच्या १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मयांक डागरने गंभीरचा बळी टिपला. पंचांनी त्याला झेलबाद ठरवले. पण ज्यावेळी हा क्षण पुन्हा स्लो मोशन मध्ये पहिला त्यावेळी चेंडू गंभीरच्या कमरेच्या जवळ लागून उडाल्याचे दिसले. ग्लोज किंवा बॅटला चेंडू लागला नसल्याचेही निष्पन्न झाले. पण हा रणजी सामना असल्याने पंचांचा निर्णय हाच अंतिम होता. DRSची सोय या सामन्यात नव्हती. त्यामुळे गंभीर पंचांवर प्रचंड संतापला आणि त्यांच्यांवर राग व्यक्त करतच तंबूत परतला.

दरम्यान, गंभीरने आपल्या डावाची सुरुवात चांगली केली होती. तो ४९ चेंडूत ४४ धावांवर खेळत होता आणि खेळपट्टीवर स्थिरावला होता. पण ५०व्या चेंडूला त्याला बाद ठरवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच गंभीरने संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात येईल की नाही याबाबत साशंकता होती. पण सध्या तरी त्याच्या संघातील स्थानाला धक्का लागलेला नाही.