पीटीआय, मुंबई

चांगल्या लयीत नसलेला भारताचा मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर तमिळनाडूविरुद्ध शनिवारपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ४१ जेतेपद मिळवणाऱ्या मुंबईकडून खेळणार आहे. यावेळी श्रेयसचा प्रयत्न संघासाठी निर्णायक कामगिरी करण्याचा राहील.

भारतीय कसोटी संघाबाहेर गेल्यानंतर श्रेयसने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सहभाग नोंदवला नव्हता. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या वार्षिक करारातून त्याला वगळण्याचा निर्णय घेतला. तो दुखापतीतून बाहेर पडल्यानंतर आता उपांत्य सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. तमिळनाडूच्या फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यासाठी मुंबईची मदार ही प्रामुख्याने श्रेयसवर असणार आहे. तमिळनाडूचा कर्णधार आर साई किशोर (४७ बळी) व डावखुरा फिरकीपटू एस अजिथ राम (४१ बळी) यांनी सत्रात सर्वाधिक गडी बाद केले आहेत. मुंबईसाठी कर्णधार अजिंक्य रहाणेला सोडून सर्व फलंदाजांनी योगदान दिले आहे. रहाणेला सहा सामन्यांत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. तसेच, मुंबईचा एकही गोलंदाज सत्रातील सर्वोत्तम दहा गोलंदाजांमध्ये नाही. मोहित अवस्थीने ३२ गडी बाद केले व तो १३व्या स्थानी आहे. मात्र, संघातील गोलंदाजांनी एकत्रितपणे चांगली कामगिरी केली आहे.

हेही वाचा >>>Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत

मुंबईच्या संघाने उपांत्यपूर्व सामन्यात बडोदा संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय नोंदवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. या सामन्यात युवा मुशीर खानने नाबाद २०३ धावांची खेळी केली. तर, दहाव्या व ११व्या स्थानावरील फलंदाज तनुष कोटियन व तुषार देशपांडे यांनी शतक झळकावले. तमिळनाडूने उपांत्यपूर्व लढतीत सौराष्ट्रवर विजय मिळवला. या हंगामातील तमिळनाडू संघाचा प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यांची मदार ही फिरकीपटूंवर असेल. तमिळनाडूचा एन. जगदीशन (८२१ धावा) आपली लय पुन्हा मिळवतो का, याकडे सर्वाचे लक्ष राहील. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांत त्याने नाबाद २४५ व ३२१ धावा केल्या होत्या. मात्र, गेल्या सात डावांत त्याला एक अर्धशतकही झळकावता आलेले नाही. बाबा इंद्रजीतनेही (६८६ धावा) हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश झाल्याने तमिळनाडूचे आक्रमण आणखी भक्कम झाले आहे. मुंबईकडे शीर्ष फळीत पृथ्वी शॉ व भूपेन लालवानीसारखे फलंदाज आहेत. तर, अष्टपैलू शार्दूल ठाकूर व शम्स मुलानीही योगदान देण्यात सक्षम आहेत. तमिळनाडूच्या फलंदाजीची मदार ही जगदीशन, इंद्रजीत व प्रदोष रंजन पॉल यांच्यावर असेल. तर, वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरला फिरकीपटू साई किशोर व अजितची साथ मिळणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>>IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात

श्रेयसची उपस्थिती संघासाठी महत्त्वपूर्ण -अजिंक्य रहाणे

श्रेयस अय्यर खेळाडूंच्या वार्षिक कराराबाबतच्या विवादाला मागे सोडून शनिवारपासून तमिळनाडूविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने  व्यक्त केला. श्रेयस आणि झारखंडच्या इशान किशनला ‘बीसीसीआय’च्या खेळाडूंच्या वार्षिक करारातून वगळण्यात आले होते. कारण, दोन्ही खेळाडूंनी आपापल्या संघांसाठी रणजी सामने खेळले नव्हते.

मुंबईकरांची कसोटी

’रणजी स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील उपांत्य फेरीच्या लढतीत प्रशिक्षकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दोन्ही सामन्यांत मंबईकर प्रशिक्षक वेगवेगळय़ा संघाची जबाबदारी सांभाळत आहे.

’मुंबईविरुद्ध सुलक्षण कुलकर्णी तमिळनाडू, तर नागपूरात चंद्रकांत पंडित मध्यप्रदेशाची जबाबदारी सांभाळत आहेत. दोघांनाही रणजी विजेतेपदाचा अनुभव आहे. विशेष म्हणजे दोघेही यापूर्वी यष्टिरक्षकच म्हणून खेळले आहेत.

’मुंबईतच घडल्याने सुलक्षण यांना मुंबई क्रिकेटची नस चांगली माहीत आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर या अलिकडच्या काळातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आपला अनुभव पणाला लावावा लागेल.

’दुसरीकडे चंद्रकांत पंडितने दोन वेळा विदर्भाला रणजी विजेतेपदापर्यंत नेले आहे. त्याच विजयी संघातील खेळाडू अजूनही विदर्भ संघातून खेळत असल्यामुळे मध्य प्रदेशाला विदर्भाला उत्तर देताना पंडीत यांचा तो अनुभव कामी येऊ शकतो.

वेळ : सकाळी ९.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-खेल, जिओ सिनेमा.