अफगाणिस्तान संघाविरुद्ध १४ जूनपासून भारत कसोटी सामना खेळणार आहे. अफगाणिस्तानला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यापासून हा त्यांच्या पहिला कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. भारतीय उपखंडातील खेळपट्ट्या या फिरकीसाठी पोषक असतात, हे ध्यानात ठेऊन अफगाणिस्तानने तीन फिरकीपटूंचा संघात समावेश केला आहे. त्यात आयपीएलमध्ये आपला ठसा उमटविलेल्या रशीद खानचाही समावेश आहे. भारतीय फलंदाजांना रशीद खान डोकेदुखी ठरू शकतो, हे आयपीएलमध्ये काही प्रमाणात दिसून आले आहे. त्यामुळे रशीदच्या फिरकीपुढे निभाव कसा लागेल, यासाठी भारतीय संघ आणि प्रशिक्षक विविध योजना आखत आहेत. या योजनांना हातभार म्हणून भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काही काळ अफगाणिस्तानचे प्रशिक्षक असलेले लालचंद राजपूत यांनी भारतीय फलंदाजांना कानमंत्र दिला आहे. रशीद खान, मुजीब-उर-रहमान यासारख्या फिरकीपटूचा या संघात समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांची कसोटी लागू शकते. अशा परिस्थितीमध्ये जर अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंना भारतीय खेळपट्ट्यांवर स्थिरावू द्यायचे नसेल, तर त्यासाठी एक विशेष योजना लालचंद राजपूत यांनी सांगितली आहे. रशीद खानच्या गोलंदाजीपुढे जर भारतीय फलंदाजांना चांगला खेळ करायचा असेल, तर त्याच्या गोलंदाजीवर निव्वळ प्रहार करणे मूर्खपणाचे ठरेल. जास्तीत जास्त चौकार-षटकार मारून जर राशिदचे आक्रमण रोखता येईल, असा फलंदाजांचा समज असेल तर ते अगदी चुकीचे आहे. उलट अशा परिस्थितीत फलंदाज बाद होऊन तंबूत परतण्याची शक्यता अधिक आहे. त्यापेक्षा राशिदपुढे निभाव लागण्यासाठी भारतीय फलंदाजांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. फलंदाजांनी फ्रंट फुटवर खेळावे. म्हणजेच फलंदाजी करताना पुढचा पाय पुढे काढून चेंडूच्या शक्य तितक्या जवळ जावे. त्यामुळे रशीदने टाकलेला चेंडू वळून यष्ट्यांवर लागण्याऐवजी बॅटवर लागेल आणि फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावेल, असा कानमंत्र राजपूत यांनी दिला. लालचंद राजपूत म्हणाले की फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर रशीद खान हा भारतीय फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो. तशातच त्यांच्या संघात तीन फिरकीपटू आहेत, त्यामळे ते फिरकीपटू फलंदाजांना सळो की पळो करून सोडू शकतात. वेगवान गोलंदाजी पाहता भारताच्या तुलनेत ते थोडेसे कमकुवत आहेत. त्याचा दौलत झादरान हा दुखापतीने ग्रासला आहे. शापूरदेखील चांगल्या लयीत दिसलेला नाही. त्यामुळे भारताने हिरव्यागार खेळपट्टीवर सामना खेळावा. तसे झाल्यास, भारत सामन्यावर वर्चस्व राखू शकेल आणि तीन दिवसांच्या आत सामन्याचा निकाल लागू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.