कर्णधार विराट कोहलीकडून प्रशिक्षकांची स्तुती

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक हे कर्णधार विराट कोहलीच्या इशाऱ्यानुसार निर्णय घेतात, अशी टीका नेहमीच कोहलीवर होत असते. पण प्रत्येक निर्णयावर होकार देणाऱ्यांपैकी शास्त्री सर नाहीत. उलट माझ्या अनेक निर्णयांना नकारघंटा देणारे शास्त्री हे एकमेव प्रशिक्षक आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये, प्रामाणिकपणे मला सल्ला देणारा शास्त्री सरांसारखा दुसरा कुणीच नाही. त्यांचा मोलाचा अनुभव आणि म्हणणे ऐकून मी माझ्या केळात अनेक बदल केले आहेत, त्यामुळे माझ्या यशात शास्त्री यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत विराट कोहलीने व्यक्त केले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होण्याआधी कोहली आणि शास्त्री यांनी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दय़ांविषयी आपली मते मांडली. ‘‘संघातील वातावरणात अनेक बदल झाले असून काही चांगल्या गोष्टी घडू लागल्या आहेत. अनेक खेळाडू आपले वैयक्तिक अनुभव त्यांना सांगत असून खेळाडूंमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यामुळे हे वातावरण असेच राहावे, अशी आमची इच्छा आहे. फक्त मलाच नाही तर अनेक खेळाडूंना शास्त्री सरांकडून बरेच काही शिकता आले. संघबांधणी करायला सुरुवात केल्यापासून शास्त्री सरांनी मोलाचे योगदान दिले आहे,’’ असेही कोहलीने सांगितले.

‘‘२०१४ च्या खडतर इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर मी आणि शिखर धवनने पुढाकार घेऊन त्यांच्याशी अनेक गोष्टींविषयी चर्चा करून २०१५च्या विश्वचषकासाठी संघबांधणीला सुरुवात केली. खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करवून घ्यायची, याचे तंत्र त्यांना चांगलेच अवगत आहे. संघव्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. त्यांचे मत जाणून घेण्यासाठी खेळाडूंची रांग लागते,’’ अशा शब्दांत कोहलीने शास्त्रींविषयी आपले मत मांडले.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघासमोर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे आव्हान असणार आहे. मात्र स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षांची बंदी घालण्यात आल्यामुळे भारताचे आव्हान सोपे झाले आहे का, याविषयी कोहली म्हणाला, ‘‘भारताच्या कामगिरीत सुधारणेला अद्याप बराच वाव आहे. आम्हाला कशी कामगिरी करायची आहे, याची जाण असून चुकीच्या गोष्टी टाळण्याकडे आमचे प्राधान्य राहील. भारतीय संघ चांगले क्रिकेट खेळत असला तरी अनेक चुका होत आहेत. त्यामुळे खेळावर नियंत्रण कसे मिळवायचे, यावर आम्हाला मेहनत घ्यावी लागेल. गोलंदाजांच्या तंदुरुस्तीचा स्तर कमालीचा उंचावला आहे. हीच आमच्यासाठी जमेची बाजू आहे.’’

विश्वचषकापर्यंत संघात बदल नाही -शास्त्री

मुंबई : पुढील वर्षी रंगणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाचे फक्त १३ सामने शिल्लक असल्यामुळे यापुढे भारतीय संघात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले. ‘‘ऑस्ट्रेलियाला रवाना होणाऱ्या १५ खेळाडूंसह आम्ही आतापासून यापुढे खेळणार आहोत. संघात प्रयोग करण्याचे दिवस आता संपले असून आता प्रत्यक्षात मैदानावर कृती करण्याची वेळ आली आहे. यापुढे आम्हाला दुखापती टाळण्याकडे तसेच खेळावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यात केलेल्या चुकांपासून भारतीय खेळाडूंनी नक्कीच बोध घेतला असेल. क्रिकेट ही शिकण्याची प्रक्रिया असून मागील चुकांची पुनरावृत्ती टाळल्यास, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचा आम्हाला फायदा होईल,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.