रविचंद्रन अश्विन केवळ भारतामधील नव्हे, तर जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असून ऑस्ट्रेलियाला भारतीय दौऱ्यात त्याला सामोरे जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, असे  मत ख्यातनाम क्रिकेट प्रशिक्षक डेव्ह व्हॅटमोर यांनी व्यक्त केले.

व्हॅटमोर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेने १९९६ मध्ये एक दिवसीय क्रिकेटचा विश्वचषकजिंकला होता. चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नैपुण्य अकादमी स्थापन करण्यात आली असून त्याच्या संचालकपदी व्हॅटमोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ते म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियाकडेही विविध स्वरूपाच्या क्रिकेटमधील नैपुण्यवान खेळाडू आहेत. मात्र भारतीय मैदानांवर भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे हुकमत गाजविणे हे आव्हानच असते. अश्विन हा केवळ अव्वल दर्जाचा गोलंदाज नसून फलंदाजीतही तो उपयुक्त आहे. सहाव्या क्रमांकावर खेळताना त्याने शतक ठोकले आहे. तो भारतीय संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. विराट कोहली याचीही त्याच्यावर मुख्य मदार असणार आहे.’’

‘‘ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅकग्रा व शेन वॉर्न यांच्यासारखे प्रभावी गोलंदाज सध्या नाहीत. या दोन गोलंदाजांनी मिळून विविध स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये एक हजारहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्थानिक स्पर्धामध्ये फिरकी गोलंदाजांवर भरघोस धावा घेत असतात मात्र भारतीय दौऱ्यात तशी कामगिरी करणे अवघड आहे. भारताकडे प्रभावी फिरकी गोलंदाजांप्रमाणेच भुवनेश्वरकुमार याच्यासारखे अव्वल दर्जाचे द्रुतगती गोलंदाजही आहेत. हे लक्षात घेता ऑस्ट्रेलियन खेळाडूंची येथे कसोटीच ठरणार आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

 

सतत शिकण्याच्या वृत्तीमुळेच केदारचे चमकदार यश -भावे

कटक : सतत शिकण्याची वृत्ती तसेच एकाग्रतेने मेहनत करण्याची वृत्ती यामुळेच केदार जाधवने आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. जागतिक स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत आणखी उज्ज्वल कामगिरी करून दाखविण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, असे महाराष्ट्राचे माजी कर्णधार व राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य सुरेंद्र भावे यांनी सांगितले.

केदारकडे उपजत नैपुण्य आहे, हे मी कनिष्ठ गटाच्या स्पर्धेच्या वेळी पाहिले होते. त्याच्या शैलीत थोडासा कमकुवतपणा दिसून येत होता. मी त्याला त्याच्या शैलीत सुधारणा कशी करायची हे सांगितल्यानंतर लगेचच त्याने तशी सुधारणा केली व त्याचाच सतत सराव केला असे सांगून भावे म्हणाले, ‘‘प्रशिक्षक, मोठा भाऊ व सल्लागार या नात्याने अनेक वेळा त्याने माझ्याकडून मार्गदर्शन घेतले आहे. पुण्यात कूचबिहार करंडक स्पर्धेत त्याने २६२ चेंडूंमध्ये १९५ धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी आकर्षक खेळाचा प्रत्यय होती. त्या वेळी त्याची देहबोली सर्वसामान्य वाटत असली तरीही त्याने केरळच्या गोलंदाजांना ज्याप्रकारे हतबल केले, ते पाहता हा खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे याची जाणीव मला झाली होती.’’