केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

पीटीआय, नवी दिल्ली

जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला (एनडीटीएल) पुन्हा मान्यता बहाल केली आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी दिली. जागतिक स्तराच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे २०१९मध्ये ‘वाडा’कडून या प्रयोगशाळेला निलंबित करण्यात आले होते.

राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला ‘वाडा‘ची पुन्हा मान्यता मिळाली आहे. जागतिक स्तरावर देशाचा खेळ उंचावण्यासाठी हे उपयुक्त ठरेल, असे ठाकूर यांनी ‘ट्विटर’द्वारे म्हटले आहे. नवी दिल्लीतून कार्यरत असलेल्या राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला चाचण्या घेण्यासाठी तात्काळ प्रारंभ करता येईल.

‘वाडा’ने जाहीर केलेल्या उत्तेजक सेवन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे. या यादीत रशिया अव्वल स्थानी आहे. याबाबत ठाकूर म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात आम्ही राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक विधेयक २०२१ संसदेत मांडले. भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्याच्या दिशेने हे योग्य पाऊल आहे.’’

निलंबनाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु या कालावधीत चाचण्यांचे नमुने ‘वाडा’ची मान्यता असलेल्या दोहा येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते. ऑगस्ट २०१९मध्ये ‘वाडा’कडून सर्वप्रथम या प्रयोगशाळेवर सहा महिन्यांची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कार्यपद्धतीत कोणतीही सुधारणा न झाल्याचे निरीक्षणाद्वारे आढळल्यानंतर हा निलंबनाचा कालावधी वाढवण्यात आला.