लिओनेल मेस्सीचे मत; चॅम्पियन्स लीगमध्ये अ‍ॅटलेटिकोला पाठिंबा

अ‍ॅटलेटिको माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम लढतीत रिअल माद्रिदला नमवून जेतेपद पटकावल्यास बार्सिलोनातील नागरिक अधिक आनंदित होतील, असे मत बार्सिलोनाचा अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सीने व्यक्त केले. रिअलने यंदाच्या हंगामात एकही चषक नावावर न केल्यास बार्सिलोनाच्या चाहत्यांचा आनंद आणखी द्विगुणित होईल, असेही तो म्हणाला.

चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या बार्सिलोनाला अ‍ॅटलेटिकोकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु त्यांच्याच विजयासाठी बार्सिलोनाने प्रार्थना केली आहे. डिएगो सिमीयन यांच्या अ‍ॅटलेटिको संघाने जेतेपद पटकवावे असे २८ वर्षीय मेस्सीला वाटत आहे. दरम्यान, ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत रिअल माद्रिद (८७) अवघ्या एका गुणाने बार्सिलोनाच्या (८८) पिछाडीवर आहे. २८ मे रोजी मिलान येथील सॅन सिरो येथे चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.

मेस्सी म्हणाला, ‘‘चॅम्पियन्स लीगमध्ये अ‍ॅटलेटिकोला विजय मिळवताना पाहणे, हे बार्सिलोनाच्या नागरिकांसाठी आनंदाचा क्षण असेल. बार्सिलोनाच्या चाहत्यांचा अ‍ॅटलेटिकोला पाठिंबा आहे. ते  आव्हानात्मक प्रतिस्पर्धी आहेत, परंतु ते आणि डिएगो यांनी गुणवत्तेच्या जोरावर ही मजल मारली आहे.’’