स्पॅनिश फुटबॉल क्लब रियल माद्रिदचा कर्णधार आणि बचावपटू सर्जिओ रामोसला करोनाची लागण झाली आहे. रियल माद्रिदने आज मंगळवारी याची पुष्टी केली.

 

एका वृत्तानुसार, एप्रिलच्या सुरुवातीपासूनच रामोस स्नायूच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. त्याची रिकव्हरी सहा आठवड्यांपर्यंत सुरू असणार आहे. रामोस शनिवारी बार्सिलोनाविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळू शकला नाही. या सामन्यात रियल माद्रिदने बार्सिलोनाला 2-1 असे हरवले.

 

दुखापतीमुळे तो लिव्हरपूलसमवेत चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यातही खेळू शकला नाही. हा सामना माद्रिदने 3-1 असा जिंकला. रामोसने माद्रिदसाठी 351 सामन्यात 41 गोल केले आहेत. माद्रिदसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या बचावपटूंमध्ये रामोस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापूर्वी, माद्रिदसाठी फर्नांडो हिरोने 548 सामन्यात 101  तर रॉबर्टो कार्लोसने 512 सामन्यात 68 गोल केले आहेत.