‘‘रिअल माद्रिदसोबत २०१८ पर्यंतचा करार संपुष्टात येईपर्यंत याच क्लबसोबत राहणार आहे,’’ असे पोर्तुगालचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सांगून माद्रिदला सोडचिठ्ठी देण्याच्या अफवांना पूर्णविराम लावला. रोनाल्डो पॅरिस सेंट जर्मेन किंवा मँचेस्टर युनायटेड या क्लबच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, परंतु रोनाल्डोने करार संपुष्टात येईपर्यंत माद्रिदसोबत राहण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पर्यायांचा विचार केला जाईल, असेही तो म्हणाला.
‘‘गेली सहा वष्रे मी स्पेनमध्ये आहे. मँचेस्टर युनायटेडमध्येही सहा वष्रे होतो आणि तो अनुभव अविस्मरणीय होता. युनायटेड अव्वल क्लब आहे, परंतु माझ्यासाठी ही जगातील सर्वोत्तम लीग आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे येथे राहायचे आहे. त्यानंतर पुढचा विचार. ’’ असे रोनाल्डोने सांगितले.
ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या गेल्या सत्रात सर्वाधिक गोलची नोंद करणाऱ्या रोनाल्डोला ‘पिचीची’ पुरस्काराने गौरविण्यात आले.