पेनल्टीमध्ये रोनाल्डोचा निर्णायक गोल ’ अंतिम फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये रिअल माद्रिदचा अ‍ॅटलेटिको माद्रिदवर ५-३ असा विजय ’ चॅम्पियन्स लीगच्या अकराव्या जेतेपदावर शिक्कामोर्तब
अतिमहत्त्वाच्या क्षणी जो कसलेही दडपण न घेता सर्वोत्तम खेळ करतो, तोच सर्वोत्तम खेळाडू ठरतो. ख्रिस्तियानो रोनाल्डो हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. याचा प्रत्यय आला तो कट्टर प्रतिस्पर्धी अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत. निर्धारित वेळेत दोन्ही संघांची १-१ अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही गोल न झाल्याने सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला. पेनेल्टी शूटआऊटमध्ये ४-३ अशी स्थिती होती. अखेरच्या शूटआऊटसाठी रिअलचा रोनाल्डो सज्ज झाला. तर त्याच्याकडून संधी हुकली असती तर पुन्हा एकदा बरोबरी होण्याची शक्यता होती. पण रोनाल्डोने चेंडू अचूक गोलजाळीत धाडला आणि एकच जल्लोष झाला. रिअलने अकराव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली होती.
दुखापतीतून सावरून रोनाल्डो परतल्याने संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले होते. सामन्याच्या पंधराव्या मिनिटाला सर्गियो रामोसने गोल लगावला आणि रिअलने १-० अशी आघाडी घेतली. आघाडी मिळवल्यावर रिअलच्या संघाने बचावावर अधिक भर दिला. मध्यंतरापर्यंत रिअलने ही आघाडी कायम ठेवली. सामन्याच्या ७५व्या मिनिटापर्यंत अ‍ॅटलेटिकोला गोल करता आला नव्हता. त्यामुळे हा सामना रिअलच जिंकणार, अशी भाकित वर्तवायला सुरुवात झाली होती. पण अ‍ॅटलेटिकोने प्रयत्न सोडले नाहीत. सामन्याच्या ७५व्या मिनिटाला मिळालेल्या पासवर अ‍ॅटलेटिकोच्या फेरेइरा कॅरास्कोने गोल लगावला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी पाहायला मिळाली. यानंतर दोन्ही संघातील अव्वल खेळाडूंना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. रोनाल्डोकडे चांगला तटवलेल्या चेंडूवर त्याला नियंत्रण मिळवता आले नाही. त्याचबरोबर हेडरने गोल मारण्याची संधीही रोनाल्डोला मिळाली होती, पण यामध्ये तो अपयशी ठरला. निर्धारित वेळेत सामना १-१ अशा बरोबरीत सुटला. अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांकडून आक्रमण करण्यात आले असले तरी कोणालाही गोल करता आला नाही.
पेनेल्टी शूटआऊटमध्ये रिअलच्या लुकास व्हॅझकूझने एवढा जोरदार चेंडू मारला की गोलरक्षकाला जागेवरून जास्त हलताही आले नाही. त्यानंतर अ‍ॅटलेटिकोच्या ग्रिझमनने गोलजाळीच्या मध्येच चेंडू मारत संघाला १-१ अशी आघाडी मिळवून दिली. रिअलच्या मार्सिलोने गोलरक्षकाच्या डाव्या बाजूला चेंडू मारत संघासाठी दुसरा गोल केला. अ‍ॅटलेटिकोच्या गॅबीने गोलरक्षकाला चुकवत संघासाठी दुसरा गोल केला आणि २-२ अशी बरोबरी झाली. रिअलकडून गॅरेथ बॅलेने शांतपणे येऊन चोख कामगिरी बजावत संघासाठी तिसरा गोल केला, तर अ‍ॅटलेटिकोकडून साऊलने गोलरक्षकाला चुकवत संघाला ३-३ अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर रिअलकडून रामोसने यशस्वीपणे चौथा गोल केला. पण त्यानंतर अ‍ॅटलेटिकोच्या जुआनफ्रानने तटवलेला चेंडू गोलजाळीत जाऊ शकला नाही आणि हीच चूक अ‍ॅटलेटिकोला भोवली. त्यानंतर पाचवा फटका मारण्यासाठी रोनाल्डो आला. तो चांगल्या फॉर्मात दिसत नव्हता. त्याची जर ही संधी हुकली असती तर अ‍ॅटलेटिकोला गोल करून बरोबरी करण्याची नामी संधी होती. पण ही संधी रोनाल्डोने अ‍ॅटलेटिकोला दिली नाही. व्यावासायिक खेळाडूचे तंत्र घोटवलेल्या रोनाल्डोने अप्रतिमपणे गोल करत रिअलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real madrid win champions league on penalties against atletico
First published on: 30-05-2016 at 03:16 IST