पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा आरोप

सुरक्षेचे कारण पुढे करून न्यूझीलंडने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली असली, तरी त्यांच्या या कृत्यामागे वेगळेच कटकारस्थान आहे, असा आरोप पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी केला आहे.

रावळपिंडी स्टेडियमवर उभय संघांत शुक्रवारी होणारा पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना न्यूझीलंडने मालिकेतून माघार घेतली. शनिवारी न्यूझीलंडचे खेळाडू मायदेशीसुद्धा परतले. परंतु पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह तेथील अनेक माजी खेळाडू आणि राजकीय व्यक्तींनी न्यूझीलंडच्या या कृत्याचा विरोध केला आहे. न्यूझीलंडसारख्या शांत वृत्तीच्या संघाकडून अशी अपेक्षा नव्हती, असे रशीद यांनी नमूद केले.

‘‘न्यूझीलंडच्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये कोणताही धोका नव्हता. आम्ही त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. तरीही त्यांनी का माघार घेतली, हे अनाकलनीय आहे. यामागे नक्कीच काहीतरी षड्यंत्र असावे,’’ असे रशीद म्हणाले. त्याशिवाय न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्याशी लवकरच यासंबंधी सखोल चर्चा करणार असल्याचेही रशीद यांनी सांगितले.

‘पीसीबी’ला मोठे आर्थिक नुकसान

न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार होते. न्यूझीलंडने दौरा रद्द केल्यामुळे ‘पीसीबी’ला मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच तेथील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला स्थिरस्थावर करण्याते त्यांचे मनसुबेही धुळीस मिळाले आहेत.