शालेय स्तरावरील ४८ क्रीडा प्रकारांचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा गुरुवारी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी पुणे येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ‘तंदुरुस्त भारत’ या मोहिमेचा एक कार्यक्रम पुणे वडगाव शेरी येथील महापालिका शाळेत आयोजित करण्यात आला होता. या वेळी शेलार म्हणाले, ‘‘खेळ हा एकात्मकतेचा भाव जोपासणारा संस्कार आहे. एकजुटीने खेळ खेळल्यानंतर त्यातून समाजात, समूहात राहण्याचा संस्कार मुलांवर होत राहतो. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खेळामुळे जोपासले जाते.’’

‘‘मोदी यांनी सुरुवातीला योगा आणि आता एकूणच खेळांसाठी एक लोकचळवळ उभी करण्यास सुरुवात केली आहे,’’ असेही शेलार यांनी सांगितले.