क्रिकेटेतर खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने रोवणारा खेळ म्हणजे नेमबाजी. रायफल असो किंवा पिस्तूल, हमखास पदकाची आशास्थान म्हणजे भारतीय नेमबाज. अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि खऱ्या अर्थाने नव्या पर्वाला सुरुवात झाली. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा नेमबाजी विश्वचषक, भारतीय नेमबाजपटूंनी सातत्यपूर्ण प्रदर्शन करत पदकतालिकेत मोलाची भर टाकली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजांनी दिमाखदार प्रदर्शन भारताला पदकतालिकेत दुसरे स्थान मिळवून दिले होते. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही नेमबाजांकडून गौरवशाली कामगिरीची अपेक्षा आहे. गेल्या स्पर्धेच्या तुलनेत नेमबाजी खेळातले काही प्रकार वगळण्यात आले आहेत. अभिनव बिंद्रा आणि हीना सिद्धू यांच्याकडे भारतीय नेमबाजी पथकाचे नेतृत्व आहे. रंजन सोधी या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही.
इतिहास जमेची बाजू
नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी तब्बल ३० पदकांवर नाव कोरले होते. अभिनव बिंद्रा, गगन नारंग, राही सरनौबत, अनिशा सय्यद, विजय कुमार, गुरप्रीत सिंग, हीना सिद्धू यांचा त्यात समावेश होता. हे सर्व नेमबाज यंदा जबरदस्त फॉर्मात आहेत आणि त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लष्करी नेमबाजपटू जितू रायने यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी केली आहे.
आव्हान खडतर
वर्षांत नियमित अंतराने होणाऱ्या नेमबाजी विश्वचषकात नेमबाजांनी लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली कामगिरी करत आशियाई स्पर्धेसाठी सज्ज होण्याचा नेमबाजांचा प्रयत्न आहे. शेवटची राष्ट्रकुल स्पर्धा घरच्या मैदानावर झाली होती. प्रेक्षकांचा मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा होता. मात्र आता त्यांच्यापुढे खडतर आव्हान आहे. क्रीडा मंत्रालय, नेमबाजी संघटना तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या पाठबळाचे पदकात रूपांतर करण्याची जबाबदारी नेमबाजपटूंवर आहे. मुंबईकर युवा नेमबाजपटू अयोनिका पॉलकडूनही मोठय़ा अपेक्षा आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणारे नेमबाजपटू
 ५० मी. रायफल थ्री पोझिशन – (पुरुष) : संजीव राजपूत आणि गगन नारंग.  (महिला)  : लज्जा गोस्वामी आणि एलिझाबेथ सुसान कोझी.
 ५० मी. रायफल प्रोन – (पुरुष) : गगन नारंग आणि  जॉयदीप कर्माकर. (महिला) : लज्जा गोस्वामी आणि मीना कुमारी
१० मी. रायफल – (पुरुष) : अभिनव बिंद्रा आणि रवी कुमार.  (महिला) : अयोनिका पॉल आणि अपूर्वी चंडेला
५० मी. पिस्तूल – (पुरुष) : जितू राय आणि गुरपाल सिंग
२५ मी. रॅपिड फायर पिस्तूल –  (पुरुष) : विजय कुमार आणि
हरप्रीत सिंग.
२५ मी. पिस्तूल – (महिला) : राही सरनोबत आणि अनिशा सय्यद
१० मी. पिस्तूल – (पुरुष) : प्रकाश नानजप्पा आणि ओम प्रकाश. (महिला) : हीना सिद्धू आणि मलाइका गोएल
ट्रॅप – (पुरुष) : मानवजीत सिंग संधू आणि मनशेर सिंग.  (महिला) :
श्रेयसी सिंग आणि सीमा तोमर.
डबल ट्रॅप – (पुरुष)  : अंकुर मित्तल आणि मोहम्मद असाब. (महिला) : श्रेयसी सिंग आणि वर्षां वर्मन
स्किट – (पुरुष) : मैइराज अहमद खान आणि बाबा पी. एस. बेदी.
(महिला) : आरती सिंग राव