रिओ ऑलिम्पिक स्पर्धा काही तासांवर येऊन ठेपली असताना भारतीय खेळाडू ऑलिम्पिकनगरीत दाखल झाले आहेत. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या खेळाडूंना तणावमुक्त करण्यासाठी ब्राझीलच्या कलाकारांनी सांस्कृतिक गाणी व नृत्याने त्यांचे स्वागत केले. या वेळी भारताच्या महिला हॉकी संघातील खेळाडू दीपिका व प्रीती दुबे यांची ब्राझिलीयन तालावर ठेका धरला, तर भारताचे प्रशिक्षक महम्मद कुन्ही यांना नर्तिकांसोबत ‘सेल्फी’ काढण्याचा मोह आवरता आला नाही. अशा या धम्माल, मस्तीमय वातावरणात भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक नगरीत प्रवेश केला.

ऑलिम्पिक नगरीत प्रथम असा सांस्कृतिक सोहळा पार पडला. जवळपास ४५ मिनिटांच्या या कार्यक्रमात भारताचा निम्मा चमू सहभागी झाला होता. त्यांच्यासोबत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नारायणस्वामी रामचंद्रन आणि भारतीय चमूचे प्रमुख राकेश गुप्ता हेही उपस्थित होते.  भारतीय चमूसह या वेळी बहामा, बुर्किना फासो, गॅम्बीया आणि नॉर्वेच्या खेळाडूंनीही कलाकारांच्या कलाकृतीला दाद दिली. ऑलिम्पिक नगरीचे महापौर, माजी बास्केटबॉलपटू आणि दोन ऑलिम्पिक पदके नावावर असलेले जॅनेथ आर्सेन यांनी ऑलिम्पिक स्पध्रेचे महत्त्व पटवून देणारे भाषण दिले.

भारतीय चमू अतिरिक्त खुच्र्या व टीव्ही खरेदी करणार

ऑलिम्पिक स्पर्धा आयोजकांनी भारतीय खेळाडूंना अतिरिक्त खुच्र्या व टीव्ही देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर भारतीय खेळाडूंचे प्रमुख राकेश गुप्ता यांनी स्वत:हून त्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘‘हॉकी संघाने अतिरिक्त खुच्र्या व टीव्ही देण्याच्या मागणीविषयी आयोजन समितीला पत्र पाठवले होते. त्यावर त्यांनी ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे भारतीय दूतावासाला खुच्र्या व टीव्ही विकत घेऊन देण्याची विनंती केली आणि आता प्रत्येक मजल्यावर टीव्ही बसविण्यात येणार असून अतिरिक्त खुच्र्याची खरेदी करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती गुप्ता यांनी दिली.