२१.७८ सेकंदात २०० मीटर शर्यत पूर्ण

जमैकाच्या इलेन थॉम्पसनने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. १०० मीटरपाठोपाठ २०० मीटर शर्यतीत इलेनने सुवर्णपदकावर कब्जा केला. इलेनने २१.७८ सेकंदात शर्यत पूर्ण केली. नेदरलॅण्ड्सच्या डाफने शिपर्सने २१.८८ सेकंदात शर्यत पूर्ण करीत रौप्य तर अमेरिकेच्या टोरी बोवीने २२.१५ सेकंदांत शर्यत पूर्ण करीत कांस्यपदक पटकावले. २४ वर्षीय थॉम्पसनने हे पदक इतिहासात जमैकाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या जेत्यांना बहाल केले. हे पदक माझ्यासाठी खास आहे. व्हेरोनिका कॅम्पबेल-ब्राऊन आणि शेली अ‍ॅन फ्रेझर प्रायस यांना पाहत मी लहानाची मोठे झाले. त्यांच्यासह खेळताना पदक पटकावणे विशेष आहे.

लांब उडीत तिआनाला सुवर्ण

लांब उडी प्रकारात अमेरिकेच्या तिआना बाटरेलेट्टाने सुवर्णपदक पटकावले. तिने ७.१७ मीटर अंतर उडी मारली. अमेरिकेच्याच ब्रिटनी रीसने ७.१५ मीटर अंतरासह रौप्य तर सर्बियाच्या इव्हाना स्पानोव्हिकने ७.०८ मीटर अंतरासह कांस्यपदकाची कमाई केली.

बोल्ट पदकासाठी सज्ज

उसेन बोल्टने २०० मीटर शर्यतीच्या पात्रता फेरीत हंगामातील सर्वोत्तम वेळेसह अंतिम फेरी गाठली. बोल्टने १९.७८ सेकंद वेळेसह शर्यत पूर्ण केली. दरम्यान, बोल्टचा प्रतिस्पर्धी जस्टिन गॅटलीन अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.

अडथळा शर्यतीत अमेरिकेची बाजी

महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत अमेरिकेच्या त्रिकुटाने दणदणीत वर्चस्व गाजवले. ब्रियाना रोलिन्सने सुवर्णपदकावर कब्जा केला. तिने ही शर्यत १२.४७ सेकंदात पूर्ण केली. निआ अलीने १२.५९ वेळेसह रौप्य तर क्रिस्ती कॅसलिनने १२.६१ सेकंदासह कांस्यपदकाची कमाई केली. निआ आणि क्रिस्ती मला बहिणीसारख्या आहेत. गेली अनेक वर्ष आम्ही एकत्र खेळत आहोत. अमेरिकेचे प्रतिनिधित्व करताना तिघींनाही ऑलिम्पिक पदक पटकावता आले याचे समाधान आहे, अशा शब्दांत ब्रियायाने भावना व्यक्त केल्या.

गतविजेत्या केम्बोईवर किप्रोटोची कुरघोडी

तिसऱ्या ऑलिम्पिक सुवर्णपदकासाठी प्रयत्नशील असलेल्या केनियाच्या इझेकिएल केम्बोईला पराभूत करून सहकारी कोन्सेस्लूस किप्रुटोने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत बाजी मारली. किप्रुटोने ८ मिनिटे ०३.२८ सेकंदांच्या ऑलिम्पिक विक्रमी वेळेसह सुवर्णपदकावर कब्जा केला. २००४ आणि २०१२च्या विजेत्या केम्बोईला (८:०८.४७ से.) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या इव्हान जॅगेरने ८ मिनिटे ०४.२८ सेकंदांसह रौप्यपदक निश्चित केले.