भारताच्या महिला खेळाडूंनी जगासमोर देशाची लाज राखल्याबद्दल त्यांना सलाम करायला हवा, असे उद्गार बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी काढले. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांची आज हैदराबादमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गछिबावली स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
गच्छिबावली स्टेडियममध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांचा तेलंगणा सरकारकडून सत्कार करण्यात आला. गोपीचंद यांनी ऑलिम्पिमध्ये भारताची लाज राखणाऱ्या महिला खेळाडूंचे आभार मानले. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक ११९ खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र, भारताला अवघी दोनच पदके मिळवता आली. यापूर्वीच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला सहा पदके मिळाली होती. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून आणखी पदकांची अपेक्षा होती. परंतु, भारतीय खेळाडूंनी रिओत पहिल्या अकरा दिवसांत निराशा केली होती. मात्र, साक्षी मलिकने कुस्तीत कांस्यपदक आणि पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवून भारताची लाज राखली.