हॉकीमध्ये क्रिकेटइतकी कर्णधारावर मोठी जबाबदारी नसते, त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंकडे नेतृत्व देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असे भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी सांगितले.

श्रीजेश हा अतिशय नैपुण्यवान खेळाडू आहे यात कोणतीही शंका नाही. क्रिकेटमधील कर्णधाराला खूप नियोजन करावे लागते व संपूर्ण सामन्यात त्याला मोठी भूमिका पार पाडावी लागते. हॉकीत कर्णधाराला खूप मोठी जबाबदारी नसते. हे लक्षात घेऊनच मी रिओ येथील स्पर्धेत प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूकडे नेतृत्व देणार आहे. सरदारसिंग, ए.व्ही.रघुनाथ, एस.व्ही.सुनील यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ रिओ येथे जाण्यापूर्वी माद्रिद येथे सराव सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी रविवारी भारतीय संघ माद्रिदला रवाना होणार आहे. भारतीय संघात श्रीजेश हा एकमेव गोलरक्षक आहे. दुखापत, आजारपणा किंवा लाल कार्ड आदी कारणास्तव त्याला मैदानाबाहेर जावे लागले, तर नेतृत्वाबाबत समस्या निर्माण होऊ नये म्हणूनही ओल्टमन्स यांनी कर्णधारपदाबाबत वेगवेगळे पर्याय ठेवले आहेत.

ओल्टमन्स यांनी पुढे सांगितले, भारतीय संघात लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंपैकी सात खेळाडूंचा समावेश आहे. मात्र या खेळाडूंनी तेथील पराभवाचे कोणतेही दडपण घेऊ नये असा सल्ला मी या खेळाडूंना दिला आहे. तेथील स्पर्धेत आपण कोठे कमी पडलो याचा अभ्यास करीत त्या चुका रिओ येथे पुन्हा घडणार नाहीत याची काळजी या खेळाडूंनी घ्यावी असेही मी त्यांना सुचविले आहे. रिओ येथील स्पर्धेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवीत खेळण्याबाबत मी खेळाडूंना सल्ला दिला आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात डोकाविले तर भारतीय हॉकीपटूंनी एकेकाळी सत्ता गाजविली होती. त्यापासून प्रेरणा घेत खेळाडू रिओ येथे अव्वल दर्जाचा खेळ करतील अशी अपेक्षा आहे.

चॅम्पियन्स स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी रौप्यपदक मिळविले होते. त्यांनी बलाढय़ ऑस्ट्रेलियास शेवटपर्यंत झुंजविले होते. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये आमचे खेळाडू याच पराक्रमाची पुनरावृत्ती करतील असे सांगून ओल्टमन्स म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये दडपण असणार यात शंका नाही मात्र या दडपणास कसे सामोरे जायचे याचे ज्ञान आमच्या खेळाडूंमध्ये आहे असेही ओल्टमन्स यांनी सांगितले.

ओल्टमन्स यांनी घेतला कबाली चित्रपटाचा आनंद

अभिनेते रजनीकांत यांचा कबाली या चित्रपट शुक्रवारी देशातील अनेक चित्रपटगृहांमध्ये झळकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोहून टाकले नाही तरच नवल. भारतीय संघाचा कर्णधार पी.आर.श्रीजेश हा रजनीकांत यांचा खूप चाहता आहे. सरावानंतर मिळालेल्या विश्रांतीचे वेळी भारतीय संघातील सर्व खेळाडू व पदाधिकाऱ्यांनी कबाली हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. श्रीजेश याने ओल्टमन्स यांना रजनीकांत यांच्यासारखी शैली करण्याबाबत मार्गदर्शनही केले.