बीजिंग ऑलिम्पिक स्पध्रेत महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत पटकावलेले सुवर्णपदक बुधवारी रशियाकडून काढून घेण्यात आले. २००८च्या ऑलिम्पिकमधील विजयी संघातील खेळाडू युलीया चेर्मोशँस्काया उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.  रशियन महासंघाच्या महिलांची ४ बाय १०० रिले शर्यतीत संघ अपात्र ठरला आहे,अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आपल्या निवेदनात म्हटली आहे.

२००८च्या नमुन्याची नव्याने चाचणी केली असता चेर्मोशँस्कायाच्या नमुन्यात दोन उत्तेजक द्रव्याचे अंश आढळल्याचे निष्पन्न झाले. ४ बाय १०० मीटर शर्यतीत बेल्जियमने रौप्यपदक जिंकले होते. त्यापाठोपाठ नायजेरियाने तिसरे, तर ब्राझीलने चौथे स्थान पटकावले होते. उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने बीजिंग व लंडन ऑलिम्पिकमधील उत्तेजक सेवनात दोषी आढळलेल्या खेळाडूंच्या नमुन्यांची पुनर्चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

रशिया, कझाकस्तान, बेलारुसवर बंदी?

उत्तेजक प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाचा पवित्रा

रिओ दी जानिरो : उत्तेजक प्रकरणामुळे रशिया, कझाकस्तान आणि बेलारुस यांच्यावर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाकडून एका वर्षांची बंदी घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर ही बंदी लागू होईल, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष टॅमस अजॅन यांनी एका मुलाखतीतून दिली. ‘‘सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला बंदीची घोषणा होण्याची शक्यता आहे. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेनंतर या देशांवर बंदी घालण्यात येईल. यामध्ये रशिया, कझाकस्तान आणि बेलारूस या देशांचा समावेश असेल, याची मी खात्री देतो,’’ असेही अ‍ॅजन यांनी सांगितले. रिओ  स्पध्रेत कझाकस्तानने पाच पदकांची कमाई केली, तर बेलारुसने दोन रौप्यपदके जिंकली आहेत.