पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत आजवर अनेक स्पर्धकांनी आपल्यातील अपंगत्वावर मात करून कलागुणांचे दर्शन घडवत संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. तिरंदाजीत नाव कमाविलेला अमेरिकेचा पॅरालिम्पियन मॅट स्टुट्झमन हा त्याच विशेष स्पर्धकांपैकी एक अॅथलिट आहे. दोन्ही हात नसतानाही आपल्या पायाला प्रबळ स्थान बनवून या उत्कृष्ट पॅरालिम्पियनने अनेकांची मने जिंकली आहेत. ३३ वर्षीय मॅटचा २०१२ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेच्या तिरंदाजी संघात समावेश होता. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत मॅटने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली होती. याशिवाय, सर्वाधिक वेळेस अचूक लक्ष्यवेध घेण्याचा राष्ट्रीय विक्रम देखील मॅटच्या नावावर आहे. सध्या संपूर्ण जगताला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेचे वेध लागले असून, याच पार्श्वभूमीवर रिओ ऑलिम्पिकच्या फेसबुक पेजवर मॅट स्टुट्झमनचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मॅटने अचूक लक्ष्यवेध घेतलेला हा व्हिडिओ थक्क करणारा आहे. सोशल मीडियावर मॅटचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्स व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देखील देत आहेत.