भारताचा मल्ल नरसिंग यादवला उत्तेजक सेवनप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने(नाडा) निर्दोष ठरविल्यानंतर आज जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) देखील नरसिंगला क्लिन चिट देण्यात आली आहे. नरसिंग यादवबाबत ‘नाडा’ने दिलेल्या निर्णयाचा अहवाल ‘वाडा’ने मागविला होता. त्यावर आज सविस्तर चर्चा केल्यानंतर ‘वाडा’ने नरसिंगला उत्तेजक सेवनप्रकरणात निर्दोष जाहीर केले असून, त्याच्या ‘रिओ ऑलिम्पिक’ समावेशासाठी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती यावेळी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी दिली.

२६ वर्षीय नरसिंग यादवने २०१४ साली जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केल्यानंतर त्याची ‘रिओ ऑलिम्पिक’साठी निवड झाली होती. पण स्पर्धा सुरू होण्याच्या महिनाभराआधी रिओ ऑलिम्पिकसाठी नरसिंग यादवची निवड करावी की सुशील कुमारची? असा वाद सुरू झाला. सुशील कुमारने तर सराव सामन्याची मागणी देखील केली होती. त्यानंतर हे प्रकरण वाढतच गेले आणि ऐनवेळी नरसिंग यादव डोपिंगप्रकरणात दोषी असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला. नरसिंगने आपल्याविरोधातील सर्व आरोप फेटाळून लावत हे आपल्याविरोधात रचलेले कट-कारस्थान असल्याचा दावा केला. अखेर ‘नाडा’कडे हे प्रकरण गेल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि नरसिंग यादव निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले. ‘नाडा’पाठोपाठ आता ‘वाडा’नेही नरसिंग यादवचा उत्तेजक प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे जाहीर केल्याने नरसिंगच्या ऑलिम्पिक समावेशाबाबतच्या आशा वाढल्या आहेत.

VIDEO: रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी स्पर्धक सज्ज, शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळा