रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडुंबद्दल आक्षेपार्ह विधान करून प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. रिओला जाऊन सेल्फी काढायचे आणि खाली हातांनी परतायचे, हेच भारतीय खेळाडूंचे रिओ ऑलिम्पिकमधील लक्ष्य असल्याचे शोभा डे यांनी ट्विटरवर म्हटले आहे. भारतीय खेळाडू पैसा आणि संधी दोन्हीचा अपव्यय करत असल्याचे डे यांचे म्हणणे आहे. फक्त नेमबाज अभिनव बिंद्रा याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असल्याचेही शोभा डे यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र, काल झालेल्या १० मी. एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्राचे कांस्य पदकाने अवघ्या ०.५ गुणांच्या फरकाने हुकले होते. अखेरच्या क्षणी अभिनवला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, शोभा डे यांच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. टेनिसपटू सोमदेव बर्मन आणि हॉकीपटू विरेन रस्किन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून डे यांच्या विधानाला विरोध दर्शविला आहे. एवढेच असेल तर शोभा डे यांनी हॉकीच्या मैदानात ६० मिनिटे धावून दाखवावे किंवा अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग यांच्यासारखी रायफल धरून दाखवावी, अशा शब्दांत विरेन रस्किन्हाने आपली नाराजी व्यक्त केली.
अरेरे..अभिनवचे पदक केवळ ०.५ गुणांनी हुकले
यापूर्वी प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखवणे अनिवार्य करण्याच्या घोषणेला विरोध केल्यामुळे शोभा डे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या.   मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखविण्याच्या निर्णयाला विरोध करत शोभा डे यांनी ट्विटरवरून फडणवीस सरकार हुकुमशहा प्रवृत्तीचे असल्याचे ट्विट केले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेऊन हक्कभंग प्रस्ताव सादर केला होता.