Rishabh Pant Broke Rohit Sharma Record: जिद्दी ऋषभ पंतने दुखापत असतानाही मँचेस्टर कसोटी सामन्यात फलंदाजीला उतरला. पंतने लढाऊ खेळी करत शानदार अर्धशतक झळकावले. या खेळीसह त्याने इतिहास लिहिला आहे. या खेळीतही ऋषभ पंतने आपल्या नावावर २ मोठे विक्रम केले आहेत. त्याने रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला आणि वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरीही केली.
ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला पहिल्या दिवशी फलंदाजी करताना दुखापत झाली होती. दुसऱ्या दिवशी पंतच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आणि आता पंत फलंदाजीला उतरणार नाही असंच अनेकांना वाटलं. पण ऋषभ पंतच्या जिद्दीने सर्वांनाच खोटं ठरवलं आणि तो मैदानावर फलंदाजीला उतरला. फक्त फलंदाजीला उतरला नाही तर अर्धशतकी खेळी करत त्याने विक्रमही आपल्या नावे केले.
२०१९ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरूवात झाली. तेव्हापासून ऋषभ पंतने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्माने ६९ डावांमध्ये २७१६ धावा केल्या होत्या. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात ५४ धावा करताच पंतने रोहितचा विक्रम मोडला आहे. अपघातामुळे १ वर्ष खेळला मैदानाबाहेर असला तरी पंत या शर्यतीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या ४ सामन्यांमध्ये, ऋषभ पंतने किमान एका डावात तरी अर्धशतकी खेळी केली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
ऋषभ पंत – ६७ डाव – २७१७ धावा
रोहित शर्मा – ६९ डाव – २७१६ धावा
विराट कोहली – ७९ डाव – २६१७ धावा
शुबमन गिल – ६६ डाव – २५१२ धावा
रवींद्र जडेजा – ६५ डाव – २२३२ धावा
ऋषभ पंतने वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरी
भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता पंतच्या नावावर आहे. ऋषभ पंतने ८२ डावांमध्ये ९० षटकार लगावले आहेत. तर महान फलंदाज वीरेंद्र सेहवागने १७८ डावांमध्ये ९० षटकार लगावले होते. जर पंत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला तर तो सेहवागला मागे टाकू शकतो. दुखापतीमुळे पंत आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसणार नाही.