विश्वचषक ही क्रिकेट जगतातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेला येत्या ३० मे पासून प्रारंभ होत आहे. भारतीय संघ विश्वचषक जिंकणारा सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. संपूर्ण देश चार वर्षातून एकदा येणाऱ्या या स्पर्धेबाबत प्रचंड उत्साही आहे. देशभरातून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतनेही ट्विट करून संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“सर्वांनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करा, आणि विश्वचषक जिंकूनच परत या. संपूर्ण देश तुमची आतुरतेने वाट पाहात आहे. भारतीय संघाला माझ्या शुभेच्छा.” अशा शब्दात ट्विट करून फलंदाज ऋषभ पंतने भारतीय संघाला प्रोत्साहित केले आहे.

गेल्या वर्षभरात ऋषभ पंतने आपल्या आक्रमक फलंदाजीने जगभरातील क्रिकेट रसिकांना प्रभावीत केले. IPL स्पर्धेतही त्याच्या धडाकेबाज फलंदाजी सिलसिला सुरु होता. भारताच्या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पर्याय म्हणून ऋषभकडे पाहिले जात होते. परिणामी विश्वचषक स्पर्धेतील त्याचा सामावेश जवळपास निश्चित समजला जात होता. मात्र, शेवटच्या क्षणी विश्वचषक संघाची निवड करताना ऋषभ पंतला डच्चू देण्यात आला. ऋषभ पंतकडे मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव नाही. त्याला अजून बरेच काही शिकायचे आहे असे कारण देत त्याच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिकची निवड केली गेली.