IND vs ENG Rishabh Pant Got Injured & Retired Hurt: भारत आणि इंग्लंड मँचेस्टर कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात ऋषभ पंत आणि साई सुदर्शनची जोडी फलंदाजी करत होती. पण ख्रिस वोक्सच्या ६७व्या षटकात ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पायातून रक्त आलं आहे. त्याला फिजिओ आधार देत उभं करत होते. अखेरीस मैदानावरील रूग्णवाहिकेने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं आहे.
ऋषभ पंत आणि साई सुदर्शनची जोडी अर्धशतकी भागीदारी रचत चांगली फलंदाजी करत होते. साई सुदर्शनने कसोटी क्रिकेटमधील त्याचं पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. तर ऋषभ पंत आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत होता. पण अचानक पंतला दुखापत झाल्याने सर्वच जणांना धक्का बसला. ऋषभ पंक दुखापतीनंतर रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला आहे.
ख्रिस वोक्सच्या ६८व्या षटकातील चौथ्या चेंडूवर पंत स्ट्राईकवर होता. पंतने त्याच्या गोलंदाजीवर स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू येऊन त्याच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या खाली जाऊन आदळला. इंग्लंडने बाद झाल्याचं अपील केलं आणि मैदानावरील पंचांनी बाद न दिल्याने रिव्ह्यू घेतला. पण रिव्ह्यूमध्ये चेंडू आधी त्याच्या बॅटला लागल्याचे दिसलं आणि तो वाचला.
रिव्ह्यूमध्ये वाचल्यानंतर ऋषभ पंतसाठी तितक्यात फिजिओ मैदानावर आले. ऋषभ पंतच्या पायाला चेंडू लागल्याने फिजिओ त्याला तपासत होते आणि पायमोजे काढल्यानंतर त्याच्या करंगळीच्या भागाला सूज आली होती आणि जिथे वोक्सने टाकलेला चेंडू आदळला होता तिथून रक्त येत होतं. ऋषभ पंतला पाय खाली जमिनीवर ठेवायलाही जमत नव्हतं, इतक्या असह्य वेदना त्याला होत होत्या.
ऋषभ पंतला चालताही येत नसल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याला आधार देत उभं केलं. तितक्यात मैदानावर दुखापत झाल्यास खेळाडूंना मैदानाबाहेर नेण्यासाठी असलेली गाडी मैदानावर येऊन त्यात पंतला बसवलं आणि त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. ऋषभ पंतच्या चेहऱ्यावर त्याला होत असलेल्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. मैदानाबाहेर गेल्यानंतर ऋषभ पंतला हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी नेण्यात आलं आहे.
ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेल्यामुळे त्याच्या जागी रवींद्र जडेजा मैदानावर फलंदाजीला आला आहे. जडेजा आणि साई सुदर्शनची जोडी मैदानात फलंदाजी करत आहे. यासह भारताने २०० धावांचा पल्ला गाठला आहे.