ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने संमिश्र सुरुवात केली आहे. वन-डे मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाने टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवत चांगलं पुनरागमन केलं. वन-डे आणि टी-२० मालिकेसाठी निवड समितीने ऋषभ पंतला वगळून यष्टीरक्षणासाठी लोकेश राहुलवर विश्वास दाखवला. त्याच्यासोबतीला संजू सॅमसनचा पर्याय देण्यात आला. कसोटी मालिकेत ऋषभची निवड करण्यात आली. परंतू त्याची कामगिरी पाहता कसोटी सामन्यात त्याला संधी मिळेल की नाही हा प्रश्नच आहे. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलच्या मते ऋषभ पंतचं वजन वाढलं आहे, त्याला आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे.

“ऋषभबद्दल बोलायला गेलं तर लॉकडाउनमध्ये तो थोडासा जाड झालाय. त्याच्यातल्या गुणवत्तेबद्दल शंका घेण्याचं काही कारणच नाही. मी जेव्हा कधीही त्याला भेटतो त्यावेळी मी हेच सांगतो की तुझ्यात गुणवत्ता आहे म्हणून तुझ्याबद्दल चर्चा होतेय. आता या गुणवत्तेचा वापर करुन धावा कशा करायच्या हे तुझ्या हातात आहे. हे दुसरं कोणीही करु शकणार नाही. ऋषभला आपल्या फलंदाजीत आणि यष्टीरक्षणात सुधारणा करण्याची गरज आहे. मला विश्वास आहे त्यालाही याची जाणीव असेल.” पार्थिव पटेल Sports Tak ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – ऋषभ पंत फक्त ऑस्ट्रेलियात फिरण्यासाठी गेला आहे, माजी भारतीय खेळाडूची टीका

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात ऋषभ पंतला संधी देण्यात आली नव्हती. परंतू पहिल्या कसोटी सामन्याआधीच्या सराव सामन्यात टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने ऋषभला संधी दिली. परंतू पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ व्यवस्थापन पंतऐवजी साहाच्या अनुभवाला पसंती देईल असे संकेत मिळतायत. त्यामुळे आगामी काळात पंत आपल्या कामगिरीत सुधारणा करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी पार्थिव पटेलला मिळाला नवीन जॉब, मुंबई इंडियन्ससाठी बजावणार महत्वाची भूमिका