टेनिस चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टेनिसची मोठी स्पर्धा विम्बल्डनची सर्वाधिक ८ जेतेपदं जिंकणारा सर्वात यशस्वी खेळाडू रॉजर फेडरर निवृत्तीनंतर पुन्हा मैदानावर उतरणार आहे. रॉजर फेडररने ३ वर्षांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती.
दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर २०२५ च्या शांघाय मास्टर्स स्पर्धेत खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवृत्तीनंतर तो पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. १० ऑक्टोबर रोजी किझोंग स्टेडियमवर होणाऱ्या ‘रॉजर अँड फ्रेंड्स’ सेलिब्रिटी डबल्स स्पर्धेत तो सहभागी होणार असल्याचे फेडररने सांगितले.
२०१७ नंतर फेडरर पहिल्यांदाच शांघायमध्ये खेळणार आहे. २०१७ मध्ये रॉजरने याठिकाणी त्याचे दुसरे टेनिसमधील एकेरी जेतेपद पटकावले होते. ही डबल्स स्पर्धा खूप खास असणार आहे. फेडररसह अनेक सेलिब्रिटी यात सहभागी होतील. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता वू लेई, मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता डोनी येन आणि माजी डबल्स जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला झेंग जी यांचा समावेश आहे.
रॉजर फेडरर निवृत्तीनंतर ३ वर्षांनी पुन्हा मैदानावर उतरणार
एका प्रमोशनल व्हीडिओमध्ये रॉजर फेडरर म्हणाला, “नमस्कार, मी रॉजर आणि शांघाय मास्टर्ससाठी किझोंग स्टेडियममध्ये परतल्याने मला खूप आनंद होत आहे. शांघाय हे नेहमीच माझ्यासाठी एक खास ठिकाण राहिलं आहे. येथील चाहते कमाल आहेत आणि आठवणी अविस्मरणीय आहेत.”
शांघाय मास्टर्स १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे. गतवर्षीचे या स्पर्धेचा विजेता जानिक सिनर आहे, ज्याने अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचचा ७-६ (४), ६-३ असा पराभव केला. २०२२ मध्ये लेव्हर कप दरम्यान फेडररने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली. त्याचा प्रतिस्पर्धी आणि मित्र राफेल नदालसह खेळताना त्याने त्याचा अखेरचा डबल्स सामना जॅक सॉक आणि फ्रान्सिस टियाफो विरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्यांना ४-६, ७-६ (२), ९-११ असा पराभव पत्करावा लागला.
२४ वर्षांच्या शानदार कारकिर्दीत, फेडररने २० ग्रँड स्लॅम एकेरी जेतेपदं जिंकली, ज्यात विक्रमी आठ विम्बल्डन जेतेपदांचा समावेश आहे. तो ३१० आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होता, त्यापैकी २३७ सलग त्याने पहिले स्थान कायम ठेवले होते. २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये फेडररने स्टॅन वॉवरिंकासह पुरूष दुहेरीत सुवर्णपदक आणि २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये एकेरीत रौप्यपदक जिंकले. या वर्षाच्या सुरुवातीला, राफेल नदालच्या गौरवशाली कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी आयोजित समारंभात फेडररने नोवाक जोकोविच आणि अँडी मुरे यांच्यासोबतही सहभाग घेतला होता.