South Africa biggest win Margin for against Australia in ODIs in Australia: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिकेनंतर वनडे मालिका खेळवली जात आहे. पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा मोठा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर हा वनडेमधील धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव आहे. केशव महाराजने कमालीचा स्पेल टाकत ५ विकेट्स घेत सामनावीर ठरला.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्याच वनडे सामन्यात गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. शिवाय दोन्ही संघातील सलामीवीरांच शतक अवघ्या काही धावांनी हुकलं. तर फिरकीपटू ट्रॅव्हिस हेड आणि केशव महाराज यांनी फिरकीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला १९८ धावांवर सर्वबाद करत ९८ धावांनी मोठा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा हा वनडेमधील ऑस्ट्रेलियावर सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी १९९४ मध्ये पर्थच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ८२ धावांनी विजय मिळवला होता.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २९६ धावा केल्या. सलामीवीर एडन मारक्रम आणि रायन रिकल्टन यांनी चांगली सुरूवात केली. पण रिकल्टन ३३ धावा करत लवकर बाद झाला. मारक्रमने ८१ चेंडूत ९ चौकारांसह ८२ धावा केल्या. याशिवाय कर्णधार तेंबा बावुमाने ७४ चेंडूत ५ चौकारांसह ६५ धावांची खेळी केली. तर मॅथ्यू ब्रिटझकेने ५६ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या.
यानंतर ट्रॅव्हिस हेडने आफ्रिकेच्या टी-२० मालिकेतील शतकवीर डेवाल्ड ब्रेविसला ६ धावांवर बाद केलं. तर खालच्या फळीत वियान मुल्डरने ३१ धावांची खेळी करत संघाला ३०० धावांच्या जवळ नेलं. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने ४ विकेट्स, द्वारशुईसने २ तर झाम्पाने १ विकेट घेतली.
द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला १९८ धावांवर ऑलआऊट
आफ्रिकेने दिलेल्या ३०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली, पण केशव महाराजने मात्र ऑस्ट्रेलियाच्या इतर कोणत्याच फलंदाजाला मैदानावर टिकू दिलं नाही. ट्रॅव्हिस हेडला २७ धावांवर सुब्रायणने बाद केलं. यानंतर केशव महाराजने मार्नस लबुशेन १ धाव, कॅमेरून ग्रीन ३ धावा, जोश इंग्लिस ५ धावा, तर एलेक्स कॅरीला खातदेखील उघडू न देता माघारी धाडलं. केशव महाराजने कमालीचा स्पेल टाकत संघाला विजयाच्या दिशेने नेलं. महाराजने १० षटकांत १ मेडेन षटक टाकत ५ विकेट्स घेत ३३ धावा दिल्या.
यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बेन द्वारशुईसने ३३ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने ९६ चेंडूत १० चौकारांसह ८८ धावा करत बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा संघाला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ४१ षटकांत १९८ धावांवर सर्वबाद केलं.