SA vs AUS Mitchell Oven Corbin Bosch Video: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयानंतर कांगारू संघाचा आफ्रिकेने दारूण पराभव केला आहे. डेवाल्ड ब्रेविसने उत्कृष्ट शतकी खेळी करत आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. ऑस्ट्रेलियाला आफ्रिकेने १६५ धावांवर सर्वबाद केलं. पण या सामन्यादरम्यान एक अनोख दृश्य पाहायला मिळालं. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
डार्विन येथील मरारा क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा टी-२० सामना खेळवण्यात आला. या सामन्यात एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं, जे क्रिकेटच्या मैदानावर क्वचित कधीतरी दिसतं. कार्बिन बॉशचा चेंडू स्टम्पवर जाऊन आदळला पण तरीही मिचेल ओवेन मात्र नाबाद राहिला.
स्टंपवर चेंडू आदळल्यानंतरही मिचेल ओवेन कसा राहिला नाबाद?
ऑस्ट्रेलियाच्या डावातील १३ वे षटक टाकण्यासाठी कार्बिन बॉश आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉशने टाकलेला चेंडू बरोबर ओवेनच्या मागील स्टम्पवर जाऊन आदळला, बेल्समधील लाईटही सुरू झाला, पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बेल्स जमिनीवर पडले नाही आणि परिणामी ओवेन नाबाद राहिला.
बेल्सला लागून चेंडू गेल्यावर रायन रिकल्टनने विकेटसाठी अपील केलं. पण बेल्सवर जमिनीवर न पडल्याने रिकल्टन एकदम शांतच झाला. इतक्यात कार्बिन बॉशने तर दोन्ही हात डोक्याला लावले. आफ्रिकेच्या खेळाडूंनी जवळ जाऊन विकेट पाहिले पण बेल्स न पडल्याने ओवेन नाबाद राहिला.
एखादा फलंदाज जर स्टंपिंग किंवा क्लीन बोल्ड होत बाद झाल्याचं अपील केल्यास स्टंपवरील बेल्स मैदानावर पडणं आवश्यक आहे, नाहीतर फलंदाज नाबाद राहतो. हाच नियम मिचेल ओवेनच्या विकेटबाबत पाहायला मिळाला.
दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-२० सामन्याचा लेखाजोखा
दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डेवाल्ड ब्रेविसच्या १२५ धावांच्या खेळीच्या जोरावर २१८ धावांचा डोंगर उभारला. डेवाल्ड ब्रेविसने फक्त ५६ चेंडूत १२ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२५ धावांची वादळी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून टी-२० क्रिकेटमधील एखाद्या फलंदाजाची सर्वात मोठी खेळी आहे. याशिवाय स्टब्सने त्याला चांगली साथ देत ३१ धावा केल्या आणि २०० धावांचा पल्ला गाठला.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ १६५ धावांवर सर्वबाद झाला. संघाकडून फक्त टीम डेव्हिडने अर्धशतकी खेळी केली. याशिवाय इतर सर्व फलंदाज फेल ठरले. आफ्रिकेकडून सर्व गोलंदाजांना विकेट्स घेण्यात यश मिळाले. क्वेना मफाका आणि कार्बिन बॉश यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतले.