ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांसारख्या महान खेळाडूंना गोलंदाजी केली. काही वेळा ते ब्रेटीपेक्षा सरस ठरले, तर काही वेळा ब्रेट ली याने त्यांना तंबूचा रस्ता दाखवला. ब्रेट ली याने नुकतीच झिम्बाब्वेचा माजी खेळाडू पॉमी बांग्वा याला ऑनलाइन मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्याने ब्रायन लारापेक्षा सचिन हा महान फलंदाज असल्याचे म्हटले, पण त्याचसोबत परिपूर्ण क्रिकेटपटू म्हणून ब्रेट ली याने तिसऱ्याच खेळाडूचे नाव घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सचिन तेंडुलकरच्या खेळीबद्दल बोलायचे झाले तर फलंदाजी करताना त्याच्याकडे इतर खेळाडूंपेक्षा अधिक वेळ असायचा. क्रिकेटमध्ये फलंदाजाकडे असलेला वेळ म्हणजे गोलंदाजाने टाकलेला चेंडू टोलवण्यासाठी विचार करून खेळला जाणारा फटका… चेंडू कितीही वेगवान असला, तरी सचिन त्या चेंडूला असा टोलवायचा जणू काही सचिन स्टंपच्या मागच्या बाजूला उभा आहे. माझ्या गोलंदाजीवर मी त्याच्या अशा खेळीचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. सचिन एक महान फलंदाज होता”, असे ब्रेट ली म्हणाला.

“ब्रायन लारा हादेखील एक उत्तम फलंदाज होता. लारा हा तडाखेबाज आणि आक्रमक फलंदाज होता. तुम्ही किती वेगाने गोलंदाजी करता याचा त्याला फरक पडला नाही. चेंडू कितीही जलद असला, तरी तो मैदानाच्या सहा भागांत कुठेही चेंडू टोलवण्यास समर्थ होता. महान फलंदाजांच्या यादीत लारा आणि सचिन यांच्यात ‘काँटे की टक्कर’ होती, पण माझ्या मते सचिन सर्वोत्तम महान फलंदाज होता”, असे ब्रेट ली याने नमूद केले.

सचिन महान फलंदाज होता असे ब्रेट ली म्हणाला, पण सर्वोत्तम परिपूर्ण क्रिकेटपटू म्हणून त्याने दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलीसचे नाव घेतले. कॅलीस हा वन डे आणि कसोटी क्रिकेट अशा दोन्ही प्रकारात १० हजारांपेक्षा जास्त धावा करणारा आणि २५० हून अधिक बळी टिपणारा एकमेव खेळाडू आहे. स्लीपमध्ये फिल्डींग करण्यासाठीही तो समर्थ होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २०० झेल आहेत. त्यामुळे सचिन महान फलंदाज होता, पण माझ्या मते जॅक कॅलीस हा परिपूर्ण क्रिकेटपटू होता असे ब्रेट ली याने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar greatest batsman but jacques kallis best cricketer says brett lee vjb
First published on: 27-05-2020 at 09:40 IST