क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. कधी एखादा खेळाडू सहज शतक ठोकून जातो, तर कधीकधी प्रचंड परिश्रम करूनही त्याला चार-पाच डावात धावा करता येत नाहीत. प्रत्येक खेळाडूचा एक वाईट काळ असतो. भारताचा कर्णधार विराट कोहली याचा फलंदाजीचा वाईट काळ होता २०१४चा इंग्लंड दौरा. या दौऱ्यात त्याला १० डावांत एकूण १३४ धावाच करता आल्या होत्या. आकडेवारीच्या दृष्टीने विराटच्या कारकिर्दीतील तो सर्वात वाईट दौरा होता. त्या दौऱ्यानंतर विराटला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक महत्त्वाचा सल्ला दिला, जो विराटसाठी वरदान ठरला.

विराटने नुकतीच BCCI टीव्हीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या देहबोलीत केलेली सुधारणा आणि सचिनने दिलेला सल्ला याबद्दल नमूद केले. “इंग्लंड दौर्‍यावर फलंदाजी करताना माझी हिप पोझिशन (फलंदाजी करताना देहबोली) थोडी समस्या निर्माण करणारी होती. त्यामुळे मला स्विंग गोलंदाजीचा सामना करणं कठीण जात होते. तसेच मला पाहिजे असलेल्या गोष्टी करण्याची इच्छा माझ्या मनात होती. पण असं केल्याने आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही हेदेखील मला नंतर समजलं”, असे विराट म्हणाला.

विराट कोहली

“फलंदाजी करताना हिप पोझिशन हा एक भाग होताच, पण मी दौऱ्याहून परत आलो अन मुंबईत सचिन पाजींना भेटलो. त्यांनी मला एक सल्ला दिला तो खूप फायद्याचा ठरला. मी त्यांच्याबरोबर काही सत्रात सराव केला. मी माझ्या हिप पोझिशनवर काम करत आहे हे मी त्यांना सांगितलं तेव्हा वेगवान गोलंदाजांविरुद्ध पाय पुढे काढून बॅटने जोरदार दणका देण्याचे महत्त्व त्यांनी मला पटवून दिले. ज्या क्षणी मी माझ्या हिप अलाइनमेंटसह हे करणे सुरू केले त्या क्षणापासून माझी फलंदाजी सुधारली. त्या सल्ल्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मला फायदा झाला”, असा अनुभव विराटने सांगितला.