गहुंजेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम ही पाटी झाकण्याच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेविरुद्ध (एमसीए) सहारा परिवारने येथील उच्च न्यायालयात अंतरिम दिलासा मिळविला आहे.
आयपीएल स्पर्धेचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी याबाबत सांगितले, स्टेडियमबाबत एमसीए व सहारा परिवार यांच्यात झालेल्या करारानुसार ठरलेली रक्कम न दिल्यामुळे स्टेडियमवरील सुब्रतो रॉय यांच्या नावाची पाटी मध्यंतरी झाकण्यात आली होती. त्याबाबत सहारा परिवारने येथील उच्च न्यायालयात दाद मागितली होती. करारानुसार ठरलेली रक्कम देण्यात आल्याचे तसेच स्टेडियमचे बांधकाम, त्याच्याशेजारी होणाऱ्या क्लबची बिल्डिंग आदीबाबत सर्व तरतुदी पूर्ण केल्याचे सहारा परिवारने कळविले होते. मात्र काही तरतुदींची पूर्तता न झाल्यामुळे एमसीएने करार रद्द केल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान अंतरिम दिलासा मिळविला असला तरी सहारा परिवार या स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचे नाव पुन्हा देण्याऐवजी नवीन पर्यायी नाव देण्याचा विचार करीत असल्याचे सहारा परिवार समूहाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सहारा परिवार व एमसीए यांच्यातील वाद हा त्यांच्यातील अंतर्गत प्रश्न आहे. अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या व्यासपीठावर हा प्रश्न आलेला नाही. त्यामुळे आम्ही मध्यस्थी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे शुक्ला यांनी सांगितले. आयपीएल स्पर्धेतील पुणे वॉरियर्सची मालकी सहारा परिवारकडे असून त्यांनी फ्रँचाईजीच्या शुल्कापोटीची काही रक्कम अद्याप भरलेली नसल्याबाबत शुक्ला यांना विचारले असता ते म्हणाले, या शुल्काबाबतची समस्या लवकरच दूर होईल. आमच्या दृष्टीने ही फारशी गंभीर समस्या नाही. यंदाच्या फ्रँचाईजीबाबत अद्याप आम्ही विचार केलेला नाही.