जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ली चाँग वेईचे प्रशिक्षक रशीद सिडेक यांनी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालची स्तुती केली आहे. ‘‘सायना मानसिकदृष्टय़ा कणखर असून जागतिक बॅडमिंटनमधील अनभिषिक्त सम्राज्ञी बनू शकते. सायना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असून दरवर्षी तिच्या खेळात प्रगती होत आहे. चीनच्या कोणत्याही खेळाडूला नमविण्याची क्षमता तिच्यात आहे. चीनच्या अव्वल खेळाडूंना हरवून सायनाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सुपर सीरिज जेतेपदे जिंकण्याची क्षमताही तिच्यात आहे. भारतात अनेक चांगले बॅडमिंटनपटू पुढे येत आहेत. पी. कश्यप, श्रीकांत, गुरुसाईदत्त, साई प्रणीथ, एच. एस. प्रणॉय आण पी. सिंधूसारखे गुणवान खेळाडू भारताकडे आहेत,’’ असे सिडेक यांनी सांगितले. सिडेक हे भारतीय बॅडमिंटन लीगमध्ये दिल्ली स्मॅशर्स संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पाहणार आहेत.