भारताच्या सायना नेहवालने चिवट झुंज देत थायलंडच्या रत्नाचोक इन्टॅनॉनला हरवले आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन सुपर सीरिज स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. पुरुष गटात भारताच्या किदम्बी श्रीकांतनेही उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना व २०१३ची जागतिक कांस्यपदक विजेती इन्टॅनॉन यांच्यातील सामना विलक्षण रंगतदार झाला. सातव्या मानांकित सायनाने द्वितीय मानांकित इन्टॅनॉनवर २८-२६, २१-१६ अशी मात केली.
पुरुष गटात १३व्या मानांकित श्रीकांतने कोरियाच्या क्वांग हेई हेओचा २१-१८, २१-१७ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. त्याला शनिवारी डेन्मार्कच्या क्रिस्तियन व्हिटिंघूसच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. श्रीकांतने यापूर्वी दोन वेळा त्याच्याविरुद्ध विजय मिळवला आहे.
सायनाला इन्टॅनॉनविरुद्ध प्रत्येक गुणासाठी झगडावे लागले. दोन्ही खेळाडूंनी स्मॅशिंगच्या सुरेख खेळाचा प्रत्यय घडवला. १८-१६ अशा आघाडीनंतर सायनाला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे इन्टॅनॉनने रंगत वाढवली. इन्टॅनॉनने नेटजवळून प्लेसिंग करताना केलेली चूक सायनाच्या पथ्यावर पडली. तिने मिळालेली आघाडी कायम ठेवत पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सायनाने ११-७ अशी आघाडी घेत झकास सुरुवात केली. तिने ही आघाडी १५-८पर्यंत वाढवली. तिच्याकडे १८-९ अशी आघाडी असताना एका निर्णयाबाबत व्हिडीओद्वारे अवलोकन करण्याची वेळ आली. त्या वेळी तिच्याविरुद्ध निर्णय गेला. तेथून इन्टॅनॉनने आणखीही काही गुण मिळवत उत्सुकता वाढवली. सायनाकडे १९-१२ अशी आघाडी असताना पुन्हा व्हिडीओची मदत घ्यावी लागली. त्या वेळीही निर्णय तिच्याविरुद्ध गेला. त्यानंतर इन्टॅनॉनने तीन वेळा मॅच पॉइंट्स वाचवले. अखेर सायनाने स्मॅशिंगचा जोरकस फटका मारून विजयावर शिक्कामोर्तब केले.
क्वांगविरुद्ध श्रीकांतने ०-५ अशा पिछाडीवरून जिगरबाज खेळ केला. ९-१४ अशी पिछाडी असतानाही त्याने जिद्द सोडली नाही. तेथून त्याने परतीचे फटके व प्लेसिंगवर सुरेख नियंत्रण मिळवीत सामन्याचा रंग पालटविला. त्याने कॉर्नरजवळ सुरेख प्लेसिंग करीत हा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये त्याने सुरुवातीपासून नियंत्रण राखले होते. त्याच्याकडे ११-६ अशी आघाडीही होती. मात्र कोरियन खेळाडूने वेगवान खेळ करीत १२-१२ अशी बरोबरी साधली व उत्कंठा वाढवली. पुन्हा १६-१६ अशी बरोबरी होती. मात्र त्यानंतर श्रीकांतने पुन्हा खेळावर नियंत्रण मिळवत सामनाजिंकला.