रिओ ऑलिम्पिकमध्ये चकमदार कामगिरी करणा-या पी व्ही सिंधू, दिपा कर्माकर, साक्षी मलिक आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पी गोपीचंद यांना सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बीएमडब्ल्यू गाडी भेट देण्यात आली आहे. हैदराबादमध्ये हा सोहळा रंगला.
रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूने रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. रौप्य पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली होती. सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीत बॅडमिंटन प्रशिक्षक पी गोपीचंद यांचे मोलाचे योगदान होते. तर साक्षी मलिकने कुस्तीत 58 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले होते. जिम्नॅस्टीकमध्ये दिपा कर्माकरने चौथा क्रमांक पटकावत चमकदार कामगिरी केली होती. ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा रोवणा-या या चार खेळाडूंचा हैदराबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनने सत्कार करण्यात आला. या खेळाडूंना असोसिएशनने बीएमडब्ल्यूची लक्झरी कार भेट दिली आहे. सचिन तेंडुलकर आणि असोसिएशनचे अध्यक्ष चामुंडेश्वरनाथ यांच्या हस्ते गाडी भेट म्हणून देण्यात आली. गोपीचंद यांच्या अॅकेडमीत हा सोहळा पार पडला.
सचिन तेंडुलकर हा रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा सदिच्छा दूत होता. सचिन तेंडुलकरने या ऑलिम्पिकवीरांचे कौतुक केले. तुमच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान असून आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत असे सचिन तेंडुलकरने सांगितले. तुमच्या या यशस्वी कामगिरीने आज संपूर्ण देशाला आनंद मिळू शकला असे गौरवोद्गारही त्याने काढले.
साक्षी म्हणाली, सचिनजी सेल्फी प्लीज
सचिन तेंडुलकरची जादू या खेळाडूंवरही दिसून आली. सचिन मंचावर आल्यावर या खेळाडूंना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सत्कार व्हावा ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे साक्षी मलिकने सांगितले. यानंतर साक्षी मलिकने सचिनसोबत सेल्फीची इच्छादेखील व्यक्त केली. माझा भाऊ तुमचा चाहता आहे. हा कार्यक्रम झाल्यावर माझ्या कुटुंबासोबत एक सेल्फी काढा अशी विनंती साक्षी मलिकने केली आणि यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sakshi malik pv sindhu dipa karmakar pullela gopichand gifted car
First published on: 28-08-2016 at 11:44 IST