भारताचा कर्णधार सरदारासिंग व ड्रॅगफ्लिकर संदीपसिंग हे आगामी हॉकी इंडिया लीगमध्ये महागडे खेळाडू ठरणार आहेत. त्यांना प्रत्येकी किमान पंधरा लाख रुपयांची आधारभूत किंमत दिली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी २४६ खेळाडूंची यादी हॉकी इंडियाने निश्चित केली आहे. दीड लाख ते १५ लाख रुपये अशा विविध टप्प्यांत या खेळाडूंची विभागणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जेमी डायर याच्याबरोबरच ग्लेन टर्नर, मॉरिट्झ फुतरेज, ऑलिव्हर कोर्न, महंमद इम्रान, महंमद रशीद, पॉल अमाट यांची प्रत्येकी साडेतेरा लाख रुपये किमान किंमत ठरविण्यात आली आहे. नेदरलँडचा पेनल्टी कॉर्नरतज्ज्ञ तेके ताकेमा व तुनदे नुईजीर यांनाही तेवढीच किंमत किमान मिळणार आहे. शिवेंद्रसिंग, गुरबाजसिंग यांच्यासाठी प्रत्येकी दहा लाख तर इग्नेस तिर्की व तुषार खंडकर यांच्यासाठी साडेसात लाख रुपये किंमत ठरविण्यात आली आहे. गोलरक्षक भरत छेत्री व पी.आर.प्रिजेश यांना अनुक्रमे दहा लाख व साडेसात लाख रुपये किमान रक्कम मिळणार आहे.
हॉकी इंडियाने सहा फ्रँचाईजी ठरविल्या असल्या तरी आतापर्यंत पाच फ्रँचाईजीकरिता अर्ज आले आहेत. त्यामध्ये दिल्ली (व्हेव समूह), रांची (पटेल-युनिएक्सेल समूह), लखनौ (सहारा इंडिया), मुंबई (बर्मन लमूह), पंजाब (जेपीसमूह) यांचे अर्ज आले आहेत.