सर्वाधिक सामन्यात अपराजित राहण्याच्या विक्रमाची बरोबरी
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने सिडनी टेनिस स्पर्धेत झंझावाती फॉर्म कायम राखताना सलग २८ व्या सामन्यात अपराजित राहण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. १९९४ मध्ये प्युअटरे रिकान गिगी फर्नाडिझ आणि नताशा व्हेराव्हा जोडीने सलग २८ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम केला होता. सानिया-मार्टिना जोडीने तेन लिआंग आणि शुई पेंग जोडीवर ६-२, ६-३ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत वाटचाल केली.
एकतर्फी लढतीत, सानिया-मार्टिना जोडीने पहिल्या सेटमध्ये दोनदा प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस भेदत वर्चस्व गाजवले. लिआंग-पेंग जोडीच्या कमकुवत सव्‍‌र्हिसचा फायदा उठवत सानिया-मार्टिना जोडीने दुसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला. उपांत्य फेरीत या जोडीसमोर तिमेआ बाबोस-कतरिना स्र्ोबोटनिक आणि रालुका ओलारु आणि यारोस्लाव्हा श्वेडोव्हा यांच्यातील विजेत्या जोडीचे आव्हान असणार आहे.
भन्नाट खेळासह सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने २०१५ कॅलेंडर वर्ष गाजवले. नऊ जेतेपदांसह या जोडीने जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरही कब्जा केला. वर्षांतील सर्वोत्तम दुहेरीची जोडी पुरस्कार पटकावणाऱ्या या जोडीने २०१६ वर्षांतही झंझावाती कामगिरी कायम राखली आहे. वर्षांतील पहिलीवहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या तयारीसाठी सिडनी स्पर्धा आयोजित केली जाते.
गेल्या वर्षी इंडियन वेल्स, मियामी, चार्ल्सटन, विम्बल्डन, अमेरिकन खुली स्पर्धा, गुआंगझाऊ, वुहान, बीजिंग, डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धाचे जेतेपद पटकावणाऱ्या या जोडीने यंदाच्या वर्षांची सलामी ब्रिस्बेन स्पर्धेच्या जेतेपदासह केली. सिडनी स्पर्धेतही अव्वल मानांकित ही जोडी जेतेपदापासून दोन विजय दूर आहे.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात सानिया मिर्झाने मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळण्यास सुरुवात केली. अवघ्या महिनाभरात या जोडीने जेतेपदाची कमाई केली. दुखापत व्यवस्थापनावर भर देत खेळणारी सानिया आणि वयाच्या पस्तिशीतही अफलातून ऊर्जेसह खेळणारी मार्टिना या जोडीला रोखणे प्रतिस्पध्र्याना कठीण झाले आहे.