दोन वर्षांनंतर होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणार

मुंबई : भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा तब्बल दोन वर्षांच्या प्रसूती रजेनंतर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेमध्ये खेळणार असल्याचे सानियाने गुरुवारी जाहीर केले.

३३ वर्षीय सानिया ऑक्टोबर २०१७मध्ये चायना खुली टेनिस स्पर्धा ही अखेरची स्पर्धा खेळली होती. सानिया जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानावरील युक्रेनच्या नाडिया किचेनॉकसह या स्पध्रेत खेळणार आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह करणाऱ्या सानियाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात इझान या आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला.

‘‘मी होबार्ट स्पर्धेत खेळणार आहे. त्यानंतर मी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतही सहभागी होणार आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या ‘आयटीएफ’ महिला स्पर्धेतही भाग घेण्याचा विचार करीत आहे. पण या स्पर्धेत सहभागी होण्याविषयी माझ्या मनात अजूनही साशंकता आहेत. माझ्या मनगटांची हालचाल कशी होते, त्यावर सगळे काही अवलंबून आहे. परंतु होबार्ट आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेत मी नक्की खेळणार आहे, असे सानियाने सांगितले.