विश्वचषक स्पर्धा २०१९ मधील असमाधानकारक कामगिरीनंतरही पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्ष मिस्बाह-उल-हक यांनी श्रीलंका मालिकेसाठी सर्फराझ अहमद याची कर्णधार म्हणून फेरनिवड केली होती. पण त्यानंतर पाकिस्तानवर टी-२० मालिकेत व्हाईटवॉशची नामुष्की ओढवल्यामुळे अखेर सर्फराझची हकालपट्टी करण्यात आली. सर्फराझच्या जागी अझर अलीला कसोटी कर्णधारपद तर बाबर आझमला टी २० कर्णधारपद देण्यात आले आहे.

विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तानच्या संघाला सुमार कामगिरीचा फटका बसला. त्यामुळे साखळी फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर श्रीलंकेसोबत तब्बल १० वर्षांनी पाकिस्तानात खेळताना यजमानांनी २-० ने एकदिवसीय मालिका जिंकली, पण टी २० मालिकेत मात्र पाकिस्तानला ३-० असा पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार आणि अनुभवी फलंदाज या नात्याने सर्फराझकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. पण तो पूर्णपणे अयशस्वी ठरला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने अखेर हा निर्णय घेतला.