भारताविरुद्ध आम्ही चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत जास्त वेळा विजय मिळवला आहे व यंदाही तीच परंपरा कायम राखणार आहोत, असा आत्मविश्वास पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदने येथे व्यक्त केला.
भारत व पाकिस्तान यांच्यात ४ जून रोजी या स्पर्धेचा सामना होणार आहे. आयसीसी विश्वचषक व ट्वेन्टी २० स्पर्धाच्या तुलनेत चॅम्पियन्स स्पर्धेत उभय देशांच्या लढतीत पाकिस्तानने जास्त वेळा विजय मिळवला आहे. याबाबत सर्फराझ म्हणाला, ‘‘आम्ही भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी उत्सुक झालो आहोत. त्यादृष्टीने आम्ही भरपूर मेहनत घेतली आणि आणखीही घेणार आहोत. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानुसार आम्ही व्यूहरचना करणार आहोत. प्रत्येक सामना आमच्यासाठी नवीन व आव्हानात्मक असणार आहे. इंग्लंडमध्ये आम्ही विजय मिळविण्यासाठीच आलो आहोत. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेतील विजयामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. या मालिकेत आमच्या सर्वच खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘आमचा सामना एजबस्टन येथे होणार असल्यामुळे तेथे जास्तीत जास्त वेळा सराव करण्यावर आम्ही भर देणार आहोत. केवळ भारताविरुद्ध नव्हे, तर प्रत्येक संघाविरुद्ध विजय मिळवण्याचे आणि पर्यायाने विजेतेपद मिळविण्याचे आमचे ध्येय आहे. हे ध्येय साकार करण्यासाठी आम्ही खूप कष्ट केले आहेत. विंडीजविरुद्धच्या मालिकेत ज्या त्रुटी आढळल्या, त्या दूर करण्यावर आम्ही भर देत आहोत. विंडीज मालिकेत आमच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा झाली आहे. येथील स्पर्धेचे कोणतेही दडपण आमच्यावर नाही. आम्ही मुक्त वातावरणात खेळणार आहोत.’’
बांगलादेशबरोबर पाकिस्तानचा संघ येथे शनिवारी सराव सामना खेळणार आहे. २००६नंतर प्रथमच बांगलादेश या स्पर्धेत खेळत आहे. मानांकनात पाकिस्तानपेक्षा बांगलादेशचा संघ वरचढ आहे. या सामन्याविषयी सर्फराझ म्हणाला, ‘‘हा सराव सामना आमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. या सामन्याद्वारे आम्हाला संघातील गुणदोषांचा अभ्यास करता येणार आहे. बांगलादेशकडे अनेक नैपुण्यवान खेळाडू आहेत. त्यांना दुय्यम मानणे चुकीचे होईल.’’